शेतीत महिलांचा वाढता सहभाग प्रेरणादायी
By Admin | Published: March 22, 2017 02:38 AM2017-03-22T02:38:21+5:302017-03-22T02:38:21+5:30
कृषी विद्यापीठात महिला दिन; विदर्भातील कर्तबगार महिलांच्या सत्कारप्रसंगी स्मिता कोल्हेंचे प्रतिपादन.
अकोला, दि. २१-आधुनिकीकरणाचा स्वीकार केलेल्या आपल्या देशात ग्रामीण आणि शहरी जीवनमान विसंगत होत असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी महिलांच्या सक्षमिकरणासोबतच कौशल्यवृद्धी साधने काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी मंगळवारी येथे केले. शेती व्यवसायातील महिलांचा वाढता सहभाग प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायंस फाउंडेशनच्यावतीने मंगळवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृहात विदर्भातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंदेकृविचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र कोल्हे, समाजसेविका अँड. ललिता पाटील, श्याम पाटील खान्देश, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले,महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्षा खोब्रागडे,हास्य कवी अँड अनंत खेळकर,डॉ.उमेश ठाकरे, विजय बारापात्रे,गणेश देशमुख डॉ.पंदेकृविचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदींची उपस्थिती होती.
डॉ.कोल्हे यांनी महिला करीत असलेल्या प्रेरणादायी कार्यासोबतच आदिवासीबहुल भागातील महिलांची प्रेरणादायी उदाहरणे येथे मांडली.आदिवासी भागात महिलांना आजही पुरुषांबरोबरीचे स्थान आहे.पंचायतीमध्ये महिलांचा सहभाग हे अधोरेखित करतो.शहरी भागात वृद्धाश्रमांची व्याप्ती वाढत असताना आदिवासी भागात याचा लवलेश नाही.एकही वृद्धाश्रम नाही. कुटुंबात वृद्धांना महत्त्वाचे स्थान आहे. आदिवासी संस्कृती प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.आदिवासी भागात काम करण्यापूर्वी माझ्या पतीने चार अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कुटुंबाचा गाडा हाकताना त्यामध्ये बडेजाव नको, अर्थात खर्चाला लगाम ही एक अट होती.आदिवासी भागात गेल्यावर मला हे शिकता आले. महिलांमध्ये उपजतच बचतीचा गुण आहे.तो आदिवासी महिला कशा सत्कारणी लावतात, हे मी अनुभवले असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी संस्कृती दिशादर्शक आहे. तेथे आजही मुलींना तेवढेच स्थान आहे. गर्भात तिची हत्या केली जात नाही, हे पुढारलेल्या समाजापुढे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. ग्रामीण कष्टकरी, कामकरी महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत स्त्री-पुरुष समानता साधने व दोहोंनी मिळून परिवार सावरणे गरजेचे आहे, असे सांगताना शहरी आणि ग्रामीण भारतातील आर्थिक, सामाजिक दुरी स्पष्ट करताना शेती आणि शेतीपूरक व्यवसायात महिलांनी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी उपस्थित महिलांना आवर्जून सांगितले.
आर्थिक संपन्न स्त्रीच परिवाराला आणि समाजाला सावरू शकते, हे आजच्या सत्कारमूर्तींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, असे गौरोद्गारअमळनेर येथील अँड. ललिता पाटील यांनी आपल्या मनोगतात केले. महिला समाजात आणि आईच्या पोटातही सुरक्षित नाही, हे मोठं शल्य आहे, त्यासाठी महिलांनी सक्षम होणं तद्वतच स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले. शेती आणि तत्सम क्षेत्रात आता महिलांनी पुढाकार घेतला असून, कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने स्वयंरोजगार आणि कौशल्यप्राप्तीमध्ये समाधानकारक वृद्धी होत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.
सत्कार सोहळ्यात विदर्भातील एकूण १७ महिलांचा कार्यगौरव करण्यात आला. यामध्ये बुलडाणा येथील अलका निर्मळ, शेगाव येथील सुवर्णा फुंडकर, अकोला येथील अनुराधा ठाकरे, मंगरूळपीर येथील सोनाली राऊत, पोही येथील वंदना मुळे, अकोला येथील पौर्णिमा घटाले, माला गिरी, यवतमाळ जिल्ह्यातील वंदना नेताम, अमरावती जिल्ह्यातील पद्मशिला तिरपुडे, वाशिम तेथील विमल राजगुरू, वर्धा जिल्ह्यातील रूपाली पाटील, अकोला येथील प्रणाली सातारकर, कळंब येथील वंदना दिगंबर, गडचिरोली येथील संगीता कुथे, बाळापूर येथील वंदना वाकोडे, अकोट येथील सुनीता चांदेलकर, बुलडाणा येथील जनाबाई गोरे आदींचा समावेश होता.
अलका निर्मळ यांचा व पोलीस निरीक्षक पदमीनी तिरपुडे यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अलका निर्मळ यांच्या दिव्यांग मुलांच्या चारचाकी वाहनासाठी युवाराष्ट्रचे धनजंय मिश्रा, डॉ. नीलेश पाटील व अविनाश नाकट यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. डॉ.पंजाबराव देयमुख कर्मचारी पथसंस्थेच्यावतीने डॉ. विनोद ढोरे यांनी ३२ हजार तर गणेश देशमुख यांनी वाहन खरेदीचा संपूर्ण खर्च देण्याची घोषणा केली.