कुष्ठरोगाचे वाढते प्रमाण ठरत आहे धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:38 PM2019-01-28T12:38:41+5:302019-01-28T12:39:07+5:30
अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे.
अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे. या आजारावर पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे २०१६-२० या कालावधीमध्ये कुष्ठरोगाच्या मुक्ततेसाठी एक पंचवार्षिक योजना राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत दरवर्षी या आजाराचा सर्व्हे करण्यात येतो. जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्व्हेच्या अहवालानुसार जगातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार ब्राझील, दक्षिण अफ्रिका या देशांसोबतच भारतातही कुष्ठरोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे. जगात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी समोर येत असून, त्यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आहेत. या आजारावर पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने देशात या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
काय सांगतो अहवाल?
जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी आढळतात. यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आढळतात.
कुष्ठरोग्यांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा भारतात आज उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील कुष्ठरोग्यांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली असून, सरकारच्या प्रयत्नांमुळे ही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अज्ञान अन् भेदभावामुळे आजाराचे प्रमाण सर्वाधिक
कुष्ठरोगाबद्दल असलेली अनास्था तसेच कुष्ठरोग्यांसोबत मोठ्या प्रमाणात भेदभाव केल्या जातो. यासोबतच या आजाराविषयी असलेल्या अज्ञानामुळे कुष्ठरोग झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कुष्ठरोगाबद्दल अज्ञान व भेदभाव यामुळे कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच यावर उपचार मिळाल्यास त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.
- डॉ. प्रशांत वानखडे