'मेनस्ट्रुअल कप'चा अकोल्यात वाढतोय टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:09 PM2019-05-14T12:09:47+5:302019-05-14T12:09:51+5:30
अकोला: मासिक पाळीमध्ये परंपरागत पॅड सोडून ‘मेनस्ट्रुअल कप’ उपयोगात आणणाऱ्या महिलांची संख्या अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असल्याची नोंद समोर येत आहे.
अकोला: मासिक पाळीमध्ये परंपरागत पॅड सोडून ‘मेनस्ट्रुअल कप’ उपयोगात आणणाऱ्या महिलांची संख्या अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असल्याची नोंद समोर येत आहे. मेनस्ट्रुअल कप आर्थिक आणि वापरण्यास सोयीस्कर असल्याने याकडे महिलांचा कल वाढल्याची माहिती आहे.
पूर्वीच्या तुलनेत आता महिलांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती झाली असून मासीक पाळीमध्ये ८० टक्के महिला पॅडचा वापर करीत आहेत. यामध्ये गाव-खेड्यातील महिलांचादेखील सहभाग आहे. पॅडचा वापर वाढल्याने पॅड निर्मितीची इंडस्ट्रीज देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मेडिकल्स स्टोअर्सपासून तर जनरल स्टोअर्सपर्यंत मोठ्या प्रमाणात पॅडची विक्री होते. पॅडचा वापरासोबतच त्यामुळे होणारे प्रदूषणही आता विक्राळ रूप धारण करीत आहे. सर्व्हिस लाइनमध्ये आणि कचरापेटीत टाकलेल्या पॅडमुळेदेखील मोठ्या प्रमाणात साथीचे आणि अन्य संसर्गजन्य आजार वाढत आहे. त्यामुळे पॅडला पर्याय शोधला जात होता. त्यात मेनस्ट्रुअल कपची निर्मिती झाली. महानगरातील महिलांसोबतच आता मोठ्या शहरातील प्रगल्भ विचारसरणीच्या महिलांमध्ये मेनस्ट्रुअल कप वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अकोल्यातही दहा टक्के महिला त्याचा वापर करीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
काय आहे मेनस्ट्रुअल कप?
मेनस्ट्रुअल कप नेमका काय आहे, त्याचा वापर कसा करावा, तो कुठे मिळते, या सर्व बाबींची जनजागृती करण्यासाठी एका सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला असून, रविवार ३० जून रोजी अकोल्यात एका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील स्त्री रोग तज्ज्ञ आणि विविध संघटनेच्या महिला या शिबिरात प्रामुख्याने उपस्थिती दर्शविणार आहे. याचा लाभ अकोल्यातील महिलांनी घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
- पॅडच्या तुलनेत मेनस्ट्रुअल कप स्वस्त आणि वापरण्यास उत्तम आहे. यामुळे प्रदूषण होत नसून, एक मेनस्ट्रुअल कप किमान दहा ते पंधरा वर्ष उपयोगात आणता येतो. स्वच्छतेच्या दृष्टीने तो उत्तम असल्यामुळे बहुतांश महिला आता मेनस्ट्रुअल कपकडे वळत आहेत.
-डॉ. वंदना बागडी, स्त्री रोग तज्ज्ञ, अकोला.