शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र मंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:49 PM2019-08-27T13:49:24+5:302019-08-27T13:49:33+5:30

शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Independent forum in Zilla Parishad to solve teacher problems | शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र मंच!

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र मंच!

googlenewsNext

अकोला: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत स्वतंत्र मंच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित सहविचार बैठकीत दिली.
शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी सहविचार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्र.या. हिवाळे, ‘डाएट’चे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे यांच्यासह संबंधित अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांचे सेवा व अन्य विषयांसंबंधी प्रश्नांचे प्रमाण पाहता, शिक्षकांच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र मंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २ ते ९ सप्टेंबरदरम्यान शिक्षकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३० सप्टेंबर रोजी विशेष बैठकीत बोलविण्यात येणार आहे आणि आस्थापनाविषयक प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती गठित करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सहविचार बैठकीत सांगितले. जिल्ह्यातील शिक्षकांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जि.प. शाळा दुरुस्तीसाठी ११ कोटींचा निधी!
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी ११ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

 

Web Title: Independent forum in Zilla Parishad to solve teacher problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.