स्वतंत्र भारत पक्ष लढविणार लोकसभेच्या ४0 जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:40 PM2019-03-20T12:40:04+5:302019-03-20T12:40:14+5:30

स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले.

Independent India party will fight 40 seats in Lok Sabha! | स्वतंत्र भारत पक्ष लढविणार लोकसभेच्या ४0 जागा!

स्वतंत्र भारत पक्ष लढविणार लोकसभेच्या ४0 जागा!

Next

अकोला: शेतकरी संघटना ही राजकीय नाही; परंतु शेतकरी संघटनेच्या विचारधारेने काम करणाऱ्या स्वतंत्र भारत पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीत ४0 उमेदवार उभे करू आणि काही ठिकाणी स्वतंत्रवादी उमेदवारांना समर्थन देऊ, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट व स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोल्यात आयोजीत पत्रपरिषदेत केली.
शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाची राज्यस्तरीय बैठक मंगळवारी अकोल्यात पार पडली. देशात जातीयवादी, धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांची हेळसांड होत असून, शेतमालाला जाणीवपूर्वक भाव देण्यात येत नाही. केंद्र व राज्य शासनाविषयी शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून स्वतंत्र भारत पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीत ४0 ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी स्वतंत्रवादी विचारांचे उमेदवार उभे असतील तर स्वतंत्र भारत पक्ष त्यांना समर्थन देईल. असे ते म्हणाले.तर आमची वाटचाल ही अर्थवादावर आहे. त्यामुळे जनतेला एक सक्षम पर्याय देण्याची आमची भूमिका आहे. असे माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी, आम्ही काही पक्षांसोबत आघाडी करण्याची भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा व बैठकही झाली; परंतु बैठकीत काही तोडगा निघू शकला नाही. विदर्भ निर्माण महामंच आमच्यासोबत आहे. त्यांनी काही उमेदवार दिले आहेत. त्या जागा सोडून आम्ही उमेदवार उभे करू, असेही वामनराव चटप यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी आमदार सरोजताई काशिकर, शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित बहाळे, शैलजा देशपांडे, सीमा नरोडे, सतीश दाणी, डॉ. नीलेश पाटील, पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, जिल्हा प्रमुख अविनाश नाकट, ज्योत्स्ना बहाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
म्हणून चांगला नेता निवडून येत नाही!
राजा मतपेटीतून तयार होतो; परंतु जनता योग्य उमेदवाराला निवडून देत नाही. शेतकरी संघटना, स्वतंंत्र भारत पक्षाकडे अनेक चांगले व योग्य उमेदवार आहेत; परंतु आम्ही मतदारांना पैसा, दारू देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक चांगले उमेदवार निवडून येत नाहीत, अशी खंतही अनिल घनवट यांनी व्यक्त केली.

जनतेनेच चौकीदार व्हावे
देशाचा चौकीदार ठरविण्याऐवजी, सक्षम व योग्य उमेदवार निवडून द्यावे आणि जनतेनेच चौकीदार व्हावे. भाजप तोडफोडीचे राजकारण करीत आहे. घराणेशाहीला भाजपच प्रोत्साहन देत असून, असे गलिच्छ राजकारण जनतेने ओळखावे. पैसा कमाविण्यासाठी नेते पक्षांतर करतात. नीतीमत्ता ढासळली असून, जनतेने मतपेटीतून अशांना रस्ता दाखवावा, असेही प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.

 

Web Title: Independent India party will fight 40 seats in Lok Sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.