भारताने जगाला विज्ञानासोबतच संस्कृती दिली-श्रीधर गाडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 03:33 PM2019-10-20T15:33:36+5:302019-10-20T15:33:57+5:30
कस्तुरी व्याख्यानमाला
अकोला: जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपला देश आहे. सर्वात प्राचीन आणि पवित्र आहे. भारताने जगाला विज्ञानासोबतच संस्कृती दिली आहे; मात्र जी वस्तु सहज उपलब्ध होते. त्याचे महत्त्व समजू शकत नाही, हा मनुष्याचा स्वभाव आहे. याच स्वभाव गुणामुळे एकेकाळी अत्युच्च असलेल्या भारताचे आज अध:पतन होत आहे, अशी खंत ज्येष्ठ वक्ते श्रीधर गाडगे (नागपूर) यांनी व्यक्त केली.
कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी आणि सुनंदा शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालयाच्यावतीने आयोजित कस्तुरी व्याख्यानमालेत शनिवारी श्रीधर गाडगे ‘पुण्यभूमि भारत’ या विषयावर बोलत होते. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत की, जे आक्रमणांमध्ये नष्ट झाले आहेत. आमच्या देशातील माणूस तर १९४७ पर्यंत आक्रमकांशी सतत लढत आला आहे; मात्र देश कधी नष्ट झाला नाही. देशाची संस्कृती नष्ट नाही झाली. देश टिकून राहिला. कारण भारताकडे भक्कम विचार आहे. विज्ञान आहे. नैतिक वृत्तीवर देशाचे मूल्यांकन ठरत असते. आज नैतिकतेत त्रुटी निर्माण झाल्या आहेत. नैतिकतेचे अध:पतन झाले आहे. ज्या देशात स्त्रीयांचे पूजन होते, त्याच देशात आज भोगवाद वाढला आहे. स्त्रीयांना केवळ भोगाची वस्तु म्हणून पाहिल्या जात आहे. स्त्रीयांवर शारीरिक अत्याचार होत आहेत. एकेकाळी भारताला जगतगुरू म्हणून ओळखल्या जायचे. कारण भारताकडे सामर्थ्य होते. आजच्या पिढीला मात्र भारताचे हे वैभव माहीत नाही. कारण व्यवहारिक शिक्षणात अशी कुठे मांडणीच नाही. देश समजून घेणे म्हणजे धार्मिक शिक्षण नाही. पुण्यभूमि भारत अशा प्रकारचे विषय युवकांनी ऐकले पाहिजे. ते ऐकत नाहीत. म्हणून आज देशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे गाडगे म्हणाले.
जगाला सापेक्षता, नवग्रहांचा विचार, ग्रहण, दहा दिशा, कालगणना, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे, अणुबॉम्ब आदींचे ज्ञान भारताने जगाला दिले आहे. वेद, पुराण, शास्त्रांमध्ये यांचा उल्लेख आहे. आज विज्ञान शोध घेत असताना या सर्वाची उकल होत असल्याचेही गाडगे यांनी सांगितले.
तत्पूर्वी, उद्घाटनप्रसंगी माजी आमदार वसंतराव खोटरे, विद्यालयाचे अध्यक्ष शांताराम बुटे, वक्ते श्रीधर गाडगे, कस्तुरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.किशोर बुटोले व्यासपीठावर विराजमान होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन व्याख्यानमालेला प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संजय गायकवाड यांनी केले. वक्त्यांचा परिचय यशवंत देशपांडे यांनी करू न दिला. आभार संजय ठाकरे यांनी मानले.