भारत राखीव बटालियन उदेगाव येथेच ; भरती प्रकिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 10:59 AM2019-12-04T10:59:38+5:302019-12-04T10:59:45+5:30
विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.
अकोला : तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणाऱ्या भारत राखीव बटालियन तेल्हाराऐवजी अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात करण्याबाबत ७ आॅगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. या निर्णयावरून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोट मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सारी राजकीय ताकद पणाला लावून मंत्रिमंडळाचा निर्णय फिरविला अन् ही बटालियन पूर्ववत तेल्हाºयातच होईल, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्रही दिले होते; मात्र आता या बटालियनसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १७६ पदांसाठी असलेली भरती केवळ गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व अहेरी तालुक्यातील उमेदवारांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे.
या भारत राखीव बटालियनबाबत राजकारण तापल्यावरही १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयात तेल्हाºयाच्या तळेगाव वडनेरऐवजी अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर भरती कोणत्याही नावाने झाली तरी ही बटालियन तेल्हाºयातच होईल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता भाजपचे सरकारच अस्तित्वात आलेले नसल्याने या बटालियनबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतानाच भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ७५ टक्के पदे ही गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांमधून तर उर्वरित २५ टक्के पदे ही चंद्रपूर, गोंदिया जिल्हा व अहेरी तालुक्यामधील उमेदवारांकडूनच भरली जाणार आहेत.
भारत राखीव बटालियन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता. यासाठी २०० एकर जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला होता. राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली असून, या बटालियनद्वारे कायदा-सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यात दोन अतिरिक्त बटालियन स्थापन करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ आणि अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र.५ ची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व कॅम्पसाठी पदांची भरती करण्याकरिता शासन निर्णय आवश्यक होता. त्यामुळे विभागाने ६७२ पदांच्या भरतीसाठी १६३ कोटी ४५ लाख ५८ हजार ४८६ रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय १२ सप्टेंबर रोजी काढला होता. दरम्यान, कॅम्पसाठी जागेच्या निर्णयाबाबत शासनाने सुधारित आदेश काढलेले नसल्याने नवा आदेश हा तळेगावचा निघतो की शिसा उदेगावचा, याबाबत संभ्रमच आहे.