भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष नव्हे, पंथनिरपेक्ष!
By Admin | Published: May 22, 2017 01:12 AM2017-05-22T01:12:38+5:302017-05-22T01:12:38+5:30
चुकीची माहिती: पाचवी, सहावीच्या हिंदीच्या पुस्तकामधून विद्यार्थ्यांना शिकविल्या जातेय पंथनिरपेक्षता
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: भारत हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगात ओळखला जातो. भारतीय संविधानामध्येसुद्धा धर्मनिरपेक्षतेला स्थान देण्यात आले आहे. हे राष्ट्र कोण्या एका धर्माचे नसून, या राष्ट्रात अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात; परंतु शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये पहिल्या पानावर छापलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत भारत हे धर्मनिरपेक्ष नसून, पंथनिरपेक्ष असल्याची चुकीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येसुद्धा भारत धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
गत दोन वर्षांपासून इयत्ता पाचवी व सहावीच्या हिंदी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एका पानावर भारताचे संविधान छापण्यात येत आहे. यात भारत पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य असल्याचे म्हटले आहे; परंतु मराठी विषयाच्या विषयामध्ये भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असल्याचे म्हटले आहे. बालभारतीच्या हिंदी व मराठी विषयाच्या पुस्तकांमधूनच विरोधाभास निर्माण केला जात असून, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय संविधानामध्ये भारताला धर्मनिरपेक्ष देश म्हटलेले असताना, हिंदी विषयाच्या पुस्तकांमध्ये पंथनिरपेक्ष देश संबोधल्या जात आहे. धर्म आणि पंथ या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. धर्माच्या आधारावर देशामध्ये अनेक पंथ बनतात; परंतु बालभारतीने मराठीतील धर्मनिरपेक्षता आणि हिंदीतील पंथनिरपेक्षता याचा अर्थ एकच काढल्याचा दिसून येत आहेत. यंदाच्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये हिंदी विषयात भारतीय संविधान हे पंथनिरपेक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी आक्षेप घेतला असून, भारत हे धर्मनिरपेक्ष की पंथनिरपेक्ष राष्ट्र आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. गत दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना हिंदीच्या पुस्तकातून पंथनिरपेक्षता शिकविल्या जात आहे. हिंदी व मराठीच्या पुस्तकांमध्ये भारत हे धर्मनिरपेक्षच असायला हवे. असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बालभारतीकडून उत्तर नाही
पाठ्यपुस्तकांमध्ये दोन वर्षांपासून भारत पंथनिरपेक्ष देश असल्याचे छापून येत आहे. याबाबत बालभारती कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बालभारतीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. तो पंथनिरपेक्ष नाही. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील भारताच्या संविधानामध्ये पंथनिरपेक्ष छापलेले आहे ते चुकीचे असून, त्यात बालभारतीने दुरुस्ती करावी. धर्म आणि पंथ हे दोन वेगवेगळे विषय आहेत. त्याचा अर्थ वेगवेगळा आहे.
-प्रा. नारायणदास चोटिया,हिंदी साहित्यिक