इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण; सैनिकांच्या शौर्याचे श्रेय कधी घेतले नाही : शरद पवारांचा मोदींना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 02:11 PM2019-10-09T14:11:55+5:302019-10-09T14:12:00+5:30
नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
वाडेगाव (अकोला) : सैनिकांच्या शौर्याचा वापर आजवर कोणत्याही सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी केला नव्हता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकून दाखविले; पण त्याचे श्रेय घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. नरेंद्र मोदी मात्र सैनिकांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी वाडेगाव येथे लगावला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या बाळापूर मतदारसंघाच्या उमेदवारासाठी वाडेगाव येथे आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. केंद्रातील मोदी सरकार देशाच्या संरक्षणाच्या मुद्याचा राजकीय स्वार्थासाठी कसा वापर करत आहेत, याची पोलखोल करताना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ‘घर में घुस के मारेंगे’ची भाषा करतात. मोदी हे स्वत: दिल्लीत बसून शत्रूला मारणार आहेत का, असा सवाल करत पवार यांनी मोदींची खिल्ली उडविली. देशापुढील मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जात नसल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या सरकारला शेतकऱ्यांप्रती कोणतीही आस्था नाही. दिलेला शब्द न पाळणारे हे सरकार असून, शेतकरी व सामान्य मानसांच्या व्यथा या सरकारने कधी समजूनच घेतल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकांवर असताना, हमीभाव व शेतकºयांविषयी कळवळ्याने बोलायचे. आता सत्तेत असताना हा कळवळा कुठे गेला असा सवालही यावेळी पवारांनी केला. या सरकारने दिलेले कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत राज्यातील ६१ टक्के शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नसल्याचेही यावेळी शरद पवार म्हणाले.
मी अजूनही तरुणच!
शरद पवार यांच्यावर उतरत्या वयातही प्रचारसभा घेण्याची वेळ आली आहे, असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. परंतु, मी अजुनही तरुण आहे. म्हातारा झालेलो नाही. आधी भाजपला घालवेल मगच मी जाईल, असा टोलाही यावेळी शरद पवार यांनी लगावला.