पिंजर परिसरात साथरोगांचे थैमान; रुग्णसंख्या वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:06+5:302021-08-14T04:23:06+5:30
प्रदीप गावंडे निहिदा : वातावरणात झालेल्या बदलांमुळे पिंजर परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, गुडघे ...
प्रदीप गावंडे
निहिदा :
वातावरणात झालेल्या बदलांमुळे पिंजर परिसरात साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, ताप, सर्दी, खोकला, हातपाय दुखणे, गुडघे दुखणे आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज आहे.
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६४ खेडेगाव असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पिंजर येथे गत १५ दिवसांपासून साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, प्रत्येक घरात रुग्ण आढळून येत आहे. तसेच खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. पिंजर येथील आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे परिसरात आरोग्य विभागाने शिबिर आयोजित करून साथरोगांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
----------------
गावात घाणीचे साम्राज्य
पिंजर येथे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाभोवती काटेरी झुडपे वाढल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचाच जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
------------------------
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन साथरोगांवर नियंत्रण ठेवून उपाययोजना कराव्यात.
-अनुसयाबाई राऊत, जि. प. सदस्य, पिंजर सर्कल
-----------------------
पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साथरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
- हाडोळे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शीटाकळी