अकाेला जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 11:08 IST2021-04-04T11:06:01+5:302021-04-04T11:08:59+5:30
Inferior food to covid patients at GMC Akola : या प्रकारच्या जेवणामुळे बरा होणारा रुग्णही आणखी आजारी पडण्याची शक्यता आहे.

अकाेला जीएमसीत कोविड रुग्णांना पुन्हा निकृष्ट दर्जाचे जेवण!
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. रुग्णांना देण्यात येणारे जेवण अर्धवट शिजलेले, तर पोळ्याही चावणे कठीण असल्याच्या रुग्णांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागले आहेत. या प्रकारच्या जेवणामुळे बरा होणारा रुग्णही आणखी आजारी पडण्याची शक्यता आहे. कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, यातील बहुतांश रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. सर्वोपचार रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी कोरोनावर लवकर मात करु, अशी आशा रुग्ण बाळगतात, मात्र येथे दाखल झाल्यानंतर कोविड रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोविड वॉर्डातील स्वच्छता गृहांची नियमित साफसफाई नसल्याने येथे दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. काही ठिकाणी पाणी देखील नसल्याच्या तक्रारी रुग्णांमधून येत आहेत. विशेष म्हणजे येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. जेवणातील डाळ अर्धवट शिजलेली, भातासाठी वापरलेला तांदुळही निकृष्ट आणि पोळ्या चावणेही कठीण असल्याने रुग्ण बरा होण्या ऐवजी आणखी आजारी पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन शब्दही कोणी धड बोलेना
जेवणासोबतच येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वागणेही धड नसल्याचे रुग्णांचे मत आहे. रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण आणि चांगली वागणूक मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, मात्र येथे दोन शब्दही कोणी धड बोलत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
बाहेरगावच्या रुग्णांवर उपासमारीची वेळ
सर्वोपचार रुग्णालयातील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने स्थानिक रुग्ण घरून जेवणाचा डबा बोलावत आहेत, मात्र शहराबाहेरील जे रुग्ण येथे दाखल आहेत त्यांना नाईलाजाने हेच जेवण घ्यावे लागत आहे. ज्येष्ठांना पोळ्या चावणेही कठीण होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मी स्वत: कोविड रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दाखल आहे. या ठिकाणी रुग्णांसोबत उद्धटपणे बोलण्यात येत आहे. गृह विलगीकरणाचाही प्रस्ताव मान्य करण्यात येत नाही. जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यातील दाळही शिजलेली नसते, तर पोळ्या खाणेही कठीण आहे. अशा वातावरणात रुग्ण बरा होण्या ऐवजी आणखी आजारी होण्याची जास्त भीती आहे.
- आशिष सावळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रुग्णसेवक संघटना, अकोला
जीएमसीबद्दल आजपर्यंत फक्त ऐकले होते, आता मात्र प्रत्यक्षात अनुभव घेत आहे. येथील व्यवस्था चांगली आहे, पण स्वच्छता गृहात पाणी नाही. निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना उपाशी राहण्याची वेळ. वयस्क लोकांना अर्धवट शिजलेली डाळ, पोळ्याही चावणे कठीण आहेे. अन्नात कस नाही. जेवण चांगले दिल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
- वर्षा धनोकार, सदस्य, अभ्यंगत समिती, जीएमसी