हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:21 AM2021-01-16T04:21:47+5:302021-01-16T04:21:47+5:30
हातरूण : बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरात यंदा हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत शेतशिवारात हरभऱ्याचे पीक बहरलेले ...
हातरूण : बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरात यंदा हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत शेतशिवारात हरभऱ्याचे पीक बहरलेले असून, घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे. दरम्यान, पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला असून, शेतकरी चिंतेत सापडला आहे.
बाळापूर तालुक्यातील हातरूण, लोणाग्रा, कंचनपूर, निंबा, नया अंदुरा या खारपाणपट्ट्यात शेतकऱ्यांनी यंदा हरभऱ्याला पसंती देत मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. खरीप हंगामात अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. रब्बी हंगामातील हरभरा पीक सद्य:स्थितीत बहरलेले असून, घाटे धरणाच्या अवस्थेत आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या धुक्यामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (फोटो)
............................................
वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला
सध्या हरभरा पीक बहरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना लागून आहे; मात्र परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी हरभऱ्याच्या शेतात शिरून पिकाची नासाडी करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
.......................................
यंदा पाणी उपलब्ध असल्याने हरभऱ्याची पेरणी केली; मात्र आता अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- शेतकरी
....................................