सोयाबीन पिकावर मरुका किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:23 AM2021-08-27T04:23:24+5:302021-08-27T04:23:24+5:30
मरुका पॉड बोरर, बिन पॉड बोरर, मुंग माँथ किंवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही कीड बहुभक्षी ...
मरुका पॉड बोरर, बिन पॉड बोरर, मुंग माँथ किंवा सोयाबीन पॉड बोरर या नावाने ओळखली जाणारी ही कीड बहुभक्षी असून, प्रामुख्याने तूर या पिकास नुकसान करते. त्याच बरोबर सोयाबीन, चवळी, मूग, उडीद व पावटा या पिकावरदेखील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
पीक फुलोरा अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. या किडीचे प्रौढ काळसर रंगाचे असून, त्यांच्या पंखांवर पांढरे चट्टे आढळतात. मादी पतंग शक्यतोवर झाडाच्या शेंड्यावर पुंजक्यात अंडी घालते. किडीची अळी हिरवट पांढऱ्या रंगाची चमकदार असून, तिच्या पाठीवर काळसर ठिपके असतात. म्हणून तिला ठिपक्याची अळी म्हणतात. या किडीचा जीवनक्रम साधारणपणे १८ ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. विशेषतः ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जास्त आर्द्रता असलेल्या भागात या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
..असे करा व्यवस्थापन
सद्यपरिस्थितीत सोयाबीनवरील मरुका किडीच्या नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारा कुठल्याही कीटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. तुरीवरील मरुका किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.६० एससीचे तीन मि.ली., इथिऑन ५० ईसीचे २० मि.ली., फ्लुबेन्डामाइड २० डब्लूजी सहा ग्रॅम, थायोडीकार्ब ७५ डब्लूपी १५ ग्रॅम, इन्डोक्झास्कार्ब १५.८० ईसी. सहा ग्रॅम, इन्डोक्झास्कार्ब १४.५० एससी चार मि.ली., नोव्हॅल्युराॅन ५.२५ इंडोक्झास्कार्ब ४.५० एससी १७.५ मि.ली. प्रमाणे १० लिटर पाण्यामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार कीटकनाशकाचा वापर करून फवारणी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी केले.