अकोल्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; दुबईहून आलेल्या युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:51 PM2021-12-26T17:51:27+5:302021-12-26T17:53:21+5:30
Omicron in Akola : रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला गृहविलगीकरणातच ठेवण्यता आले आहे.
अकोला: दुबईतून अकोल्यात आलेल्या त्या युवतीचा ‘ओमायक्रॉन’ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला गृहविलगीकरणातच ठेवण्यता आले आहे. अकोल्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी आतातरी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या धडकी भरविणारी आहे. अशातच गत आठवड्यात शेजारील बुलडाणा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आठवडा होत नाही, तोच अकोल्यात दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल १९ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ओमायक्रॉनच्या निदानासाठी युवतीचे ‘आरएनए’ सॅम्पल तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. रविवारी त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. युवतीची प्रकृती स्थिर असून तिला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अकोलेकरांसाठी ही धोक्याची घंटा असून, नागरिकांनी आता तरी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.