महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 10:36 AM2021-03-09T10:36:06+5:302021-03-09T10:36:17+5:30

Fertilizer price increased खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

Inflation reached a tipping point; Fertilizer price increased by Rs. | महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

Next

अकोला : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या जिल्ह्यात मशागतीचे कामे सुरू आहेत. गतवर्षी अति पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

 

जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, तूर, सोयाबीन तर रबी हंगामात हरभरा, मूग, ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात बहुतांश जमिनी कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप हंगामावरच अवलंबून असते. गतवर्षी मूग, उडदावर आलेल्या व्हायरसमुळे नुकसान झाले. त्यानंतर सततच्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारीचे व बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. असे असतानाही मोठ्या हिमतीने शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे. ग्रामीण भागात नांगरणी, वखरणीची कामे सुरू आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने यांत्रिक मशागतही महागली असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच दरवर्षी शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. यंदा १ मार्चपासून खत उत्पादक कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति ५० किलोच्या बॅग मागे १७.३४ टक्के वाढ केली आहे. ही वाढ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे. उत्पादन खर्चानुसार शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानेे शेतकरी संकटात सापडला आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

 

दरवर्षी महागाई वाढत चालली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात गेला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर खताच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही.

- सुनील घोगरे, शेतकरी, टाकळी खु.

 

पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त असतानाच खताच्या किमती वाढल्या. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने गोरगरीब नागरिकांनी जगावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- निखिल दामोदर, शेतकरी, टाकळी खु.

 

खरिपाची पेरणी काही महिन्यांवर असतानाच डीएपी खताच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांच्या हिताची नाही. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन झालेली दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-धम्मपाल शिरसाट, शेतकरी, घुसर.

 

इंधन वाढल्याने मशागतही महागली

पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाणारी मशागतही महागली आहे. सध्या डिझेलचे भाव गगनाला पोहोचल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगामाची पेरणी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सध्या ग्रामीण भागात नांगरणी, वखरणीची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

 

 

खत                                    आधीचे दर                         आताचे दर

१०-२६-२६                         ११८५                         १३८५

१२-३२-१६                         १२००                         १३७५

डीएपी                         १२००                                     १४५०

२०-२०-०-१३                        ९५०                                    ११२५

Web Title: Inflation reached a tipping point; Fertilizer price increased by Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.