अकोला जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 01:25 PM2018-09-18T13:25:41+5:302018-09-18T13:28:37+5:30
अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे; परंतु जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली आहे.
अकोला: २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार समायोजनाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे; परंतु जिल्ह्यातील २१ शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती रखडली आहे. यामागे शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालकांमधील वाद असल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची माहिती त्यांच्याकडून मिळाली नाही.
माध्यमिक शिक्षण विभागाने ३४७ पैकी ३३२ शाळांची संचमान्यता पूर्ण केली आहे. शाळांना रिक्त पदे, अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय आदींची माहिती मागविली असून, सध्या शिक्षण विभागाकडे मराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची नावे आली आहेत. उर्वरित शाळांची अतिरिक्त शिक्षकांची नावे अद्याप आली नाहीत. यामागे शिक्षक- शिक्षण संस्थांमधील सुरू असलेले वाद आहेत. अनेक शिक्षण संस्थांमध्ये सेवा ज्येष्ठता डावलून शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात येत आहेत. संस्थाचालकांच्या जवळच्या आणि पदाने कनिष्ठ असलेल्या शिक्षकांना मात्र जाणीवपूर्वक अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून बाजूला काढण्यात येत असल्याने, याठिकाणी शिक्षक आणि संस्थाचालकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. हे वाद बाजूला सारून शिक्षणसंस्थांनी त्यांच्याकडील अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी, आरक्षण, विषय आणि पटसंख्या याची माहिती माध्यमिक शिक्षक विभागाला सादर करण्याचे सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत; परंतु शिक्षणसंस्था याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत. या शिक्षणसंस्थांकडून माहिती आल्यास यंदा १६0 च्या जवळपास अतिरिक्त शिक्षकांची संख्या जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)