तहसील प्रशासनाने मागितली ‘त्या’ प्रकरणाची माहिती
By Admin | Published: March 23, 2017 02:46 AM2017-03-23T02:46:02+5:302017-03-23T02:46:02+5:30
तुर खरेदीचे प्रकरण; तेल्हारा बाजार समितीत खळबळ
तेल्हारा, दि. २२- नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्याच्या नावावर व्यापार्यांची तूर अवैधरीत्या मोजल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती नायब तहसीलदारांनी मागितली असून, ही माहिती वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले. २२ मार्च रोजी शेतकर्यांनीही तहसीलदारांना निवेदन देऊन नाफेडच्या केंद्रावर होणारे गैरप्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.
तेल्हारा येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रावर दोन बोगस पावत्यांवर व्यापार्याचा माल शेतकर्याच्या नावाने विकल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. लोकमतच्या या वृत्तामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या संचालकांची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच तेल्हाराचे नायब तहसीलदार भारत किटे यांनी सदर प्रकरणाची नाफेड आणि बाजार समितीची सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे किटे यांनी सांगितले.
तसेच आज शेतकर्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, केंद्रावर माप धिम्या गतीने होत असून, काट्याची संख्या वाढविणे व गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. निवेदनावर उत्तम नळकांडे, विजय बोर्डे, प्रदीप महल्ले, विशाल गाडेकर, महेश वडतकार, शुभम वडतकार, उमेश बाजोड, विजय वाकोडे, देवानंद वडतकार, अंकुश मिरगे, सागर पाथ्रीकर, धनंजय गावंडे, नीलेश वाकोडे, प्रशांत वाकोडे, सोपान सरोदे व पवन कोल्हे आदी शेतकर्यांच्या स्वाक्षरी आहेत.
शेतकर्याची तूर लंपास
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील गजानन दिनकर काकड यांनी आपल्या शेतातील उत्पादित तूर २६ फेब्रुवारी २0१७ रोजी नाफेडला विक्रीसाठी तेल्हारा बाजार समितीच्या यार्डमध्ये ३५ नग प्लास्टिक बारदान्यामध्ये विक्रीसाठी आणली. बाजार समितीच्या आवक नोंदप्रमाणे टोकन क्रमांक ८७८ त्यांना मिळाला. २0 मार्च रोजी सदर शेतकरी बाजार समितीच्या यार्डमध्ये आपला माल पाहण्यासाठी आले असता तीन कट्टे तूर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच बाजार समितीचे सचिव माधव पाथ्रीकर यांना कळविले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार माहिती घेतली आहे. या प्रकरणात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- राजूसिंह राठोड,
सहायक निबंधक, तेल्हारा