शिक्षण विभागाने मागविली अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:19 PM2018-08-12T15:19:54+5:302018-08-12T15:21:40+5:30
अकोला: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसह रिक्त पदे, आरक्षण, विषय आदी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांकडून मागविली आहे.
अकोला: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसह रिक्त पदे, आरक्षण, विषय आदी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांकडून मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची यादी, त्यांच्या हरकती, सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून ही माहिती मागविण्यात आली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी अर्ध्याधिक शिक्षकांचे समायोजनच झाले नव्हते. त्यामुळे अनेक शिक्षकांचे विभागस्तरावर समायोजन करण्यात आले होते. अतिरिक्तचा विषय समोर आला की शाळांमधील शिक्षकांना धडकीच भरते.
जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाइन समायोजन करण्यात येते. वेळेपूर्वीच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने २०१७ व १८ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे आॅनलाइन समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त शिक्षकांच्या नाव, शाळा, आरक्षणासह यादी तयार करण्यात येणार आहे. ही माहिती गोळा झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करून त्यांच्याकडून हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात येते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने आणि अनेक शिक्षण संस्था माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचा अनुभव आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात येत असल्याने, ही प्रक्रिया लांबणीवर पडू नये आणि वेळेपूर्वीच ही माहिती गोळा झाली तर शिक्षकांना न्याय देता येईल. त्यांच्या अडचणी समजून घेता येतील आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया योग्यरीत्या राबविता येईल, हा यामागील उद्देश आहे. यंदासुद्धा मराठी शाळा व अल्पसंख्याक शाळांमधील १३0 च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)