तूर खरेदीची मागविली माहिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 04:49 AM2017-06-20T04:49:39+5:302017-06-20T04:49:39+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीने दिले पत्र.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हय़ातील तूर खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करण्यात येत असून, सहकारी उपनिबंधक कार्यालयामार्फत तालुका स्तरावरील सहकारी उपनिबंधक समितीद्वारे या चौकशीला वेग तर आलाच आहे. यासंदर्भात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही ६२ व्यापार्यांना पत्र देऊन मागील सहा महिन्यातील तूर खरेदी विक्रीची माहिती मागीतली आहे.
यावर्षी सुरुवातीला बाजारात तूर खरेदीत शेतकर्यांची प्रचंड लूट झाली. ही लूट थांबविण्यासाठी राष्ट्रीय कृषी उत्पादन विकास महामंडळाद्वारे (नाफेड) तूर खरेदी करण्याची मागणी शेतकर्यांनी केली. त्यानंतर राज्यासह जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडने तूर खरेदी केंद्र सुरू केले.
या केंद्रावर हमीदराने तूर खरेदी करण्याचे आदेश असले, तरी प्रतवारीचे निकष लावून येथे तूर खरेदी करण्यात आली. हीच तूर नंतर कमी किमतीत व्यापार्यांनी खरेदी केली. तीच तूर पुन्हा नाफेडला विकण्यात आल्याचे आरोप झाले.
या संदर्भात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने ६२ व्यापार्यांना पत्र दिले असून, ३१ डिसेंबर २0१६ ते ३१ मेपर्यंत खरेदी केलेल्या तुरीची वस्तुनिष्ठ माहिती मागितली आहे.
३१ डिसेंबर ते ३१ मेपर्यंत केलेल्या तूर खरेदीची माहिती व्यापार्यांकडे मागितली आहे. त्यासंदर्भात ६२ व्यापार्यांना ही माहिती देण्यासाठीचे पत्र दिले आहे.
- सुनील मालोकार,
सचिव, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.