शाळांकडून मागविली अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदांची माहिती
By admin | Published: April 5, 2017 07:47 PM2017-04-05T19:47:31+5:302017-04-05T20:51:04+5:30
माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शाळांकडून शिक्षकांची विस्तृत माहिती मागविली आहे.
समायोजनाची प्रक्रिया: ७५ शाळांची संचमान्यता पूर्ण
अकोला: शिक्षण आयुक्तांनी अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाइन समायोजन करण्याचे वेळापत्रक निश्चित केले असुन, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती मागविली आहे. जिल्ह्यातील ७५ शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असुन, लवकरच अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
शिक्षण विभागाने २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळातील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनेचे जाहिर केले आहे. गतवर्षी जिल्ह्यामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यंदा सुद्धा अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवुन समायोजन करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. शिक्षण विभागाला पत्र पाठवुन वेळापत्रकानुसार आॅनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. यावेळी ५ एप्रिलपासून ते ३१ मेपर्यंत समायोजनेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. परंतु जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया राबविण्यात येईल. असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले. यंदा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आली असुन, शिक्षक अतिरिक्त ठरविताना कनिष्ठ शिक्षक, विषयाची गरज आणि आरक्षण सुद्धा लक्षात घेतले जाणार आहे.