सात-बारावर वारसाची नोंद करता येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:18 AM2021-05-24T04:18:16+5:302021-05-24T04:18:16+5:30
व्याळा : सात-बारावर वारसाची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे ...
व्याळा : सात-बारावर वारसाची नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे, कमी करणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहणार नसून, नागरिकांना घरबसल्या नोंदणीसाठी अर्ज करण्याची सुविधा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विभागाने नागरिकांना सात-बारा डिजिटल उपलब्ध करून देऊन राज्यातील काही बँकांशी करार केला आहे. शेतकरी यांना कर्ज घेण्यासाठी बँकांना सात-बारा, आठ अ देण्याचे काम नाही, तर तो सर्व बँकेतच उपलब्ध होणार आहे. तसेच अनेक कार्यालयात ही सात-बारा लिंक जोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना सात-बारासाठी चकरा मारायचे काम बंद होणार आहे.
अशी होणार प्रक्रिया...
मृत व्यक्तीनंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी नागरिकांनी महाभूमी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. हा अर्ज संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जाची ऑनलाईन पडताळणी करतील. ऑनलाईनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार आहे. आवश्यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसात वारस नोंद होईल.
वारस नोंद, तक्रार अर्ज ई हक्क प्रणाली ही सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असून घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- रामदास जगताप, राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प