मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:13 PM2019-08-06T14:13:03+5:302019-08-06T14:13:10+5:30
तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला.
खेट्री (जि. अकोला) : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यातील आसोला येथील रहिवासी हसन खान अशरफ खान ५५, यांची पिंपळखुटा येथे शेती आहे. ते शेती वाहण्यासाठी गेल्या अनेक वषार्पासून पिंपळखुटा येथे राहत होते. पैशाच्या देवाण घेवाण वरून हसन खान अशरफ खान याला पिंपळखुटा येथील तिघांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये हसन खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हसन खान यांना आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेले असता, हसन खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले होते. तेव्हापासून हसन खान यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने हसन खान यांना त्यांच्या नातेवाईकांनी सोमवार,५ आॅगस्ट रोजी पुढील उपचारासाठी वाशिम कडे नेत असताना, रात्री ११:३० वाजताच्या सुमारास हसन खान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मंगळवारी ६ आॅगस्ट रोजी पिंपळखुटा येथे घटनास्थळी भेट देऊन काही जणांचे जबाब नोंदविले असून, चौकशीसाठी पिंपळखुटा येथील एकास ताब्यात घेतले आहे. मृतक हसन खान यांची उत्तरीय तपासणी वाशीम येथे करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तरीय तपासणी अहवाल किंवा मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पुढची भूमिका घेऊन कारवाई करण्यात येईल असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे.