चिमुकलीवर अत्याचार करणारा कारागृहात
By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:38 AM2017-07-26T02:38:16+5:302017-07-26T02:38:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ज्योती नगर येथील रहिवासी तसेच केबल आॅपरेटर शैलेश माथने याने चार वर्षाआधी घरात भाडेकरू असलेल्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
शेखर रामदास माथने (४८) हा जठारपेठ परिसरातील ज्योती नगर येथे रहिवासी आहे. चार वर्षांपूर्वी पीडित मुलगी नऊ वर्षांची असताना माथनेच्या घरात आई-वडिलांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होती. ही अल्पवयीन मुलगी शेखर माथनेच्या घरात टीव्ही पाहण्यासाठी जात होती. त्यावेळी माथने हा मुलीला मांडीवर बसवून तिच्या शरीराला नको तिथे हात लावत होता. एक दिवस ती टीव्ही पाहण्यासाठी घरात आली असता तिला मांडीवर बसवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला; परंतु त्यावेळी मुलीला समज नसल्याने प्रकरण शांततेत होते. दरम्यान, ही मुलगी सध्या शहरातील एका शाळेत इयत्ता आठवी वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये सोमवारी दामिनी पथकाच्या मार्गदर्शनादरम्यान, त्या मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आठवण आली. तिच्या सांगण्यावरून दामिनी पथकाने केबल आॅपरेटर शैलेश माथनेविरोधात सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.