तेल्हारा येथे खड्डय़ांची महापूजा करून केले अभिनव आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 08:21 PM2017-11-06T20:21:19+5:302017-11-06T20:22:13+5:30
तेल्हारा: तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील रस्त्यांवर नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत अभिनव आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: तालुक्यातील सर्वच रस्त्यांची झालेली दुरवस्था, रस् त्यावर पडलेले खड्डे व वारंवार मागणी करूनही दुरुस्तीसाठी प्रशासनाने केलेले दुर्लक्ष या बाबींना कंटाळून युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने आक्रमक होत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी नारळ फोडून खड्डय़ांची महापूजा करीत ६ नोव्हेंबर रोजी अभिनव आंदोलन केले.
तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अनेक दिवसांपासून खालावत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे अक्षरश: रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यांवरून चारचाकी वाहने तर दूर दुचाकी वाहनाने रहदारी करणे कठीण झाले आहे. तसेच या रस्त्यामुळे प्रवाशांना पाठीचे विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बाबीकडे लोकप्रतिनिधींनी, सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या अडचणी पाहता युवा क्रांती विकास मंच या सामाजिक संघटनेने पुढाकार घेत शासनाकडे निवेदन दिले होते; परंतु यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे संघटनेने तालुक्यात विविध ठिकाणी खड्डय़ांची महापूजा करून आंदोलन केले. यावेळी युवा क्रांती विकास मंच अध्यक्ष रामभाऊ फाटकर, ता. अध्यक्ष अनंत मानखैर, प्रवीण वैष्णव, संतोष राठी, संजय हिवराळे, विशाल नांदोकार, संजय पाथ्रीकर, श्याम खारोडे, नि तीन मानकर, शे. ताजोद्दीन, शब्बीर शहा, स्वप्निल सुरे, शुभम सोनटक्के, राहुल जापर्डे, आकाश फाटकर, राजेश काटे, रवी इंगळे, नीलेश निवाणे, सागर जऊळकार, अमित काकड, अमित घोडेस्वार, अक्षय सुरे, बल्लू घोडेस्वार, गणेश आखरे, मयूर सुगंधी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तेल्हारा तालुक्यातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. या खड्डय़ांमुळे वाहनांमध्ये मोठय़ा प्रमाणात बिघाड होत असून, प्रवाशांनासुद्धा त्रास होत आहे.
- नितीन सपकाळ
वाहन चालक, तेल्हारा आगार