जिल्ह्यात ‘जलजीवन मिशन’च्या कामांची चौकशी करा! जलव्यवस्थापन समितीची मागणी
By संतोष येलकर | Published: February 17, 2024 04:32 PM2024-02-17T16:32:42+5:302024-02-17T16:34:07+5:30
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत मागणी.
संतोष येलकर, अकोला : जलजीवन मिशनअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजिप्रा)मार्फत करण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी शुक्रवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत करण्यात आली.
जलजीवन मिशनमध्ये जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ६९ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम ‘मजीप्रा’मार्फत करण्यात येत असून, या कामाची त्रयस्थ संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत केली. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत शिर्ला येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम ‘मजीप्रा’कडून करण्यात येत असून, या कामाच्या दर्जासंदर्भात अनेक तक्रारी असल्याने, संबंधित कामाची समिती सदस्यांच्या उपस्थितीत त्रयस्त संस्थेमार्फत तातडीने चौकशी करून, कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती सुनील फाटकर यांनी सभेत केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला उपाध्यक्ष सुनील फाटकर, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन, सदस्य संजय अढाऊ, जगन्नाथ निचळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जलव्यस्थापनाच्या कामांचे अंदाजपत्रक मंजूर !
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन विभागांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जलव्यवस्थापनाच्या प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, या अंदाजपत्रकाला मंजुरी देत सर्वसाधारण सभेत ठेवण्याची शिफारसही या सभेत करण्यात आली.