अकोला जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:18 AM2020-08-17T10:18:31+5:302020-08-17T10:18:41+5:30
या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी केली जाणार आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ५३५ ग्रामपंचायतींच्या मागील पाच वर्षातील अभिलेख्यांची (रेकॉर्ड) तपासणी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायतींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) १२ आॅगस्ट रोजी दिला. त्यानुसार या तपासणीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची तपासणी केली जाणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर असलेली सर्व प्रकारची अभिलेखे अद्ययावत नसल्यामुळे संबंधित माहितीच्या दृष्टीने प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्यानंतर, त्या ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांचे दप्तर नवीन ग्रामसेवकांना देण्यात आले नसल्याने, ग्रामपंचायतींचे कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांचे दप्तर अद्ययावत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ५३५ ग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील अभिलेख्यांची (रेकॉर्ड) १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना १२ आॅगस्ट रोजी दिला आहे. ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीत आढळून येणाºया त्रुटीचा अहवाल सादर करण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील कारभाराची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक!
जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या अंतर्गत ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी पंचायत समित्यांमधील पंचायत विभागाच्या १४ विस्तार अधिकाºयांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विस्तार अधिकाºयांच्या चमूकडून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी करण्यात येणार आहे.