बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:59+5:302021-08-22T04:22:59+5:30

वाडेगाव: परिसरात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांना लाभदायक ठरत आहे. शेतशिवारात पिके बहरली असून, बहरलेल्या पिकांवर ...

Insect infestation on flowering crops increased! | बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला!

बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला!

Next

वाडेगाव: परिसरात गत दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांना लाभदायक ठरत आहे. शेतशिवारात पिके बहरली असून, बहरलेल्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, दमदार पावसाने शेतकरी सुखावला असून, सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे.

वाडेगाव शिवारात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचा पेरा वाढला आहे. परिसरात शेतकरी कपाशीला पसंती देत होते; मात्र बोंडअळी, बोंडसळ, मावा, लाल्या आदी रोगांच्या आक्रमणाने कपाशीचे उत्पादन दरवर्षी घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. नगदी पीक म्हणून समजले जाणारे उडीद, मूग पिकाने गतवर्षीच्या हंगामात दगा दिल्याने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सध्यस्थितीत शेती पिकांच्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. पिके बहरली आहेत; मात्र रोगराई तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत.

--------------------------

यावर्षीच्या खरीप हंगामाच्या प्रारंभीपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्याच्या परिस्थितीत पडत असलेला पाऊस उपयुक्त ठरत असून, पिके बहरली आहेत.

- सुनील मानकर, शेतकरी

----------------------

पावसाच्या सरीमुळे पिके बहरली आहेत. काही दिवसांपूर्वी पिके सुकण्याच्या मार्गावर होती, परंतु या पावसाने संजीवनी मिळाली आहे.

-शिवाजी म्हैसने, देगाव शेतकरी.

-----------------------------------

निंबा फाटा परिसरात पाऊस; पिकांना जीवदान

नया अंदुरा: कारंजा रमजानपूर, हाता, अंदुरा, अंत्री, शिंगोली, बहादुरा, कवठा, निंबा, मोखा, जानोरी, दगडखेड,निंबी, सागद या परिसरात पेरण्यांना उशीर झाल्याने पिके वर आल्यानंतर सतत पावसाने दांडी मारली होती. दोन ते तीन दिवसांपासून निंबा फाटा परिसरात पाऊस सुरू आहे. चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा पाऊस पिकांना वरदान ठरत आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, तुर, उडीद, मूग पिकांचा पेरा केलेला आहे; परंतु पाऊस पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सामोरे जात आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केलेला होता; मात्र या पिकांना लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. या वर्षी तीच परिस्थिती ओढावते की काय या विवंचनेत शेतकरी आहे. पावसाने २० दिवसांपासून खंड दिल्याने शेतकऱ्यांनी - खुरपणी, टवरणी, वखरणी, खते देणे इत्यादी कामे आटोपून घेतली. आता पावसाने हजेरी लावल्यामुळे निंबा फाटा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Insect infestation on flowering crops increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.