वृक्षारोपण करतांना स्थानिक झाडांचाच आग्रह धरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:09+5:302021-07-12T04:13:09+5:30
वृक्षारोपण करतांना स्थानिक झाडांचाच आग्रह धरावा. आपल्या जैवविविधतेला उपयोगी आहेत, अशीच झाडे लावावीत. झाड लावतांना खड्डा कमीत कमी १ ...
वृक्षारोपण करतांना स्थानिक झाडांचाच आग्रह धरावा. आपल्या जैवविविधतेला उपयोगी आहेत, अशीच झाडे लावावीत. झाड लावतांना खड्डा कमीत कमी १ फूट रूंद व २ फूट खोल करावा. त्यात उपलब्ध झाल्यास जुने शेणखत व काळी माती टाकावी व झाड लावावे. झाड लावतांना रोपाला आधार देण्यासाठी काठी लावावी. वृक्षारोपणासाठी आणलेले रोप सुदृढ असावे. रोपाची पिशवी फाडण्यापूर्वी ती हाताने चांगली दाबून घ्यावी जेणेकरून झाड लावताना आतील माती पडून मुळे उघडी पडणार नाहीत. कॉलनीत अथवा रोडच्या लगत झाडे लावा़यची असल्यास अमलताश, पांगारा, पळस, जारूळ यांसारखी झाडे लावावीत, जेणेकरून उन्हाळ्यात या झाडांना फुले आल्यावर तो परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजून जाईल. काटेसावर, वड, पिंपळ, औदुंबर आदी झाडे मंदिर, क्रीडांगण यांसारख्या मोकळ्या जागेत लावावीत.
तर अर्जुन, कडुलिंब, रिठा, बिहाडा, बकुळ, कदंब, शिसव, सोनचाफा, कुंभी यांसारखी झाडे शाळा, महाविद्यालये व कार्यालयाच्या आवारात लावावीत.
पांगारा, काटेसावर, पळस, अमलताश ही झाडे म्हणजे पक्ष्यांचे ज्युस ट्री आहेत. ही झाडे आपल्या परिसरात लावली तर विविध पक्षी तुमच्या परिसरात बघायला मिळतील. सध्या वन महोत्सव सुरू आहे, प्रादेशिक वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागात सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध आहेत.
-अमोल सावंत, संस्थापक, निसर्गकट्टा, अकोला.