महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली कोचिंग क्लासेसची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:53 PM2019-06-25T12:53:14+5:302019-06-25T12:55:35+5:30

मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जवाहर नगर भागातील कोचिंग क्लासेसची पाहणी केली.

Inspecting coaching classes by Municipal Commissioner Sanjay Kapadnis | महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली कोचिंग क्लासेसची पाहणी

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली कोचिंग क्लासेसची पाहणी

Next
ठळक मुद्दे ‘फायर आॅडिट’ची फाइल सादर करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला दिल्या. कारवाई करण्याच्या सबबीखाली काही संचालकांकडून पैसे उकळल्याचे प्रताप समोर आले.लोकमतमध्ये उमटलेल्या वृत्ताची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी कोचिंग क्लासची पाहणी केली.

अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार शहरातील शिकवणी वर्गात अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अग्निशमन विभागाने संबंधित संचालकांना नोटीस जारी केल्या होत्या. त्यानंतर मात्र तपासणी व कारवाईच्या सबबीखाली काही संचालकांकडून पैसे उकळण्यात आले. या प्रकरणाला लोकमतने चव्हाट्यावर आणल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी जवाहर नगर भागातील कोचिंग क्लासेसची पाहणी केली. तसेच यासंदर्भात ‘फायर आॅडिट’ची फाइल सादर करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला दिल्यामुळे या विभागाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
सुरत येथे घडलेली दुर्दैवी घटना लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील कोचिंग क्लासेस, खासगी हॉस्पिटल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अग्निशमन विभागाला आदेश दिले होते. या विभागाने सुरुवातीला ५१ कोचिंग क्लासेस व १३ वसतिगृहांची पाहणी केल्यानंतर संबंधितांना नोटीस जारी केली होती. यापैकी काही कोचिंग क्लासच्या संचालकांनी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची सुरुवात केली होती. तर काहींनी तसे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची तपासणी व कारवाई करण्याच्या सबबीखाली काही संचालकांकडून पैसे उकळल्याचे प्रताप समोर आले. या प्रकारामुळे अग्निशमन विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यासंदर्भात लोकमतमध्ये उमटलेल्या वृत्ताची दखल घेत आयुक्त संजय कापडणीस यांनी जवाहर नगर भागातील कोचिंग क्लासची पाहणी केली. यावेळी क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, संजय खोशे यांची उपस्थिती होती.

अग्निशमन विभागाला टाळले!
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी सरस्वती कोचिंग क्लास, आकाश कोचिंग क्लास, युनिक कोचिंग क्लास, ललीत टिटोरियल कोचिंग क्लास यांची पाहणी केली. यावेळी अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेणे आयुक्तांनी टाळल्याची चर्चा होती.

इमारतींचा नकाशा सादर करा!
मनपा आयुक्तांनी पाहणी केलेल्या कोचिंग क्लासच्या इमारतींना नगररचना विभागाने दिलेल्या विविध परवानग्या व मंजूर केलेला नकाशा सादर करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणेच्या मुद्यावर फायर आॅडिटची फाइल सादर करण्याची सूचना अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे यांना केली आहे.

 

Web Title: Inspecting coaching classes by Municipal Commissioner Sanjay Kapadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.