विशेष शिबिरात ९७ संशयीत क्षयरुग्ण बालकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:50 PM2018-04-17T14:50:19+5:302018-04-17T14:50:19+5:30
अकोला : क्षयरोग मुक्त अकोला जिल्हा - २०२० अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या क्षयरुग्ण तपासणी मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांपैकी ९७ बालकांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रविवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात करण्यात आली.
अकोला : क्षयरोग मुक्त अकोला जिल्हा - २०२० अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या क्षयरुग्ण तपासणी मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांपैकी ९७ बालकांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रविवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात करण्यात आली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनात क्षयरोग तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गतच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत २ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत १३ एप्रिलपर्यंत तपासणी झालेल्या ३३,९६३ बालकांपैकी १३७ बालकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून आली होती. या बालकांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तर्फे विशेष तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात एकून ९७ बालकांची तपासणी सीबी नॅट मशिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यापैकी ८ बालकांना मॉन्टेक्स तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर २७ बालकांना छातीचा एक्स-रे, तर ३ बालकांना सीटी स्कॅन करण्याचे सुचविण्यात आले. उर्वरित ५५ बालकांना रक्त व थुंकी तपासणी करण्याचे सांगण्यात आले. या बालकांना सुचविण्यात आलेल्या तपासण्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत करण्यात आल्या असून, अद्याप अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश नेताम, क्षयरोग विभागाच्या डॉ. मेधा गोळे, ‘राबास्वाका’ जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे आदींची उपस्थिती होती.