प्रभाग ८ मध्ये तुंबलेले नाले, गटारांची झाेन अधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:14 AM2021-06-29T04:14:14+5:302021-06-29T04:14:14+5:30
अकाेला : डाबकी राेड भागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये नाले सफाईचा पुरता बाेजवारा उडाला असून ठिकठिकाणी घाणीने तुंबलेले गटार ...
अकाेला : डाबकी राेड भागातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये नाले सफाईचा पुरता बाेजवारा उडाला असून ठिकठिकाणी घाणीने तुंबलेले गटार साचले आहेत. मनपा प्रशासनासह भाजप नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवाशांचे आराेग्य धाेक्यात आल्याचे वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशित करताच साेमवारी पश्चिम झाेनमधील क्षेत्रीय अधिकाऱ्यासह आराेग्य निरीक्षकांनी प्रभाग ८ मध्ये विविध भागाची पाहणी केली. जेसीबीद्वारे नाले सफाईसह स्वच्छतेची कामे केली जाणार असल्याची माहिती आहे.
शहरालगतच्या भाैरद ग्रामपंचायतचा काही भाग २०१६ मध्ये महापालिका क्षेत्रात सामील करण्यात आला. प्रभागांची पुनर्रचना केल्यानंतर प्रभाग ८ अस्तित्वात आला. दाट लाेकवस्ती व भाैगाेलिक क्षेत्रफळ माेठे असणाऱ्या या प्रभागात विकासाची कामे निकाली निघतील, अशी नागरिकांना अपेक्षा हाेती. रस्ते, नाल्या, जलवाहिनीचे जाळे आदी कामे करताना नियाेजन न केल्यामुळे रहिवाशांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या उंचीपेक्षा नाल्यांची उंची वाढविण्यात आली आहे. काही ठिकाणी सांडपाण्याचा प्रवाह नैसर्गिकदृष्ट्या न काढता मनमानीपणे काढल्यामुळे नाल्यांमधील सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाची हलगर्जी व नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे प्रभागात ठिकठिकाणी घाणी पाण्याचे डबके व गटारे साचली आहेत. दूरदृष्टी न ठेवता करण्यात आलेल्या विकास कामांचा प्रभागातील रहिवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर पश्चिम झाेनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे व आराेग्य निरीक्षकांनी लक्ष्मी नगर, मेहरे नगर, कॅनाॅल परिसर, गायत्री नगर आदीसह विविध भागाची पाहणी केली.
गजानन नगरमध्ये अतिक्रमण
प्रभाग ८ मधील बहुतांश भाग गुंठेवारी असल्याने सांडपाण्याचा निचरा हाेत नसल्याची समस्या आहे. ठिकठिकाणी सर्व्हिस लाइनचा फज्जा उडाला असून महापालिका प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरवल्याने नाले व गटारे घाणीने तुंबली आहेत. अशा स्थितीत गजानन नगर, लक्ष्मी नगर,अमरप्रीत काॅलनी, संत गाेराेबा मंदिर परिसरातील स्थानिक रहिवाशांनीदेखील जागाेजागी अतिक्रमण उभारल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे.
खुल्या भूखंडांमध्ये सांडपाणी
प्रभागातील खुल्या भूखंडांचा वापर नाल्यांमधील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी केला जात आहे. स्थानिक रहिवाशांनी कॅनाॅलच्या जागेत असलेल्या माेठ्या नाल्यांवर अतिक्रमण उभारल्याने नाल्यांमधील सांडपाणी परिसरात नागरिकांच्या मालकीच्या भूखंडांत साचले आहे.