तपासणी करण्यापूर्वीच नाला सफाईच्या कामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:07 AM2017-08-01T02:07:07+5:302017-08-01T02:07:33+5:30
अकोला: क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर मान्सूनपूर्व नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे होतील, या विश्वासाला तडा गेला असून, नाला सफाईच्या कामात घोळ झाल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर मान्सूनपूर्व नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे होतील, या विश्वासाला तडा गेला असून, नाला सफाईच्या कामात घोळ झाल्याचे समोर आले आहे. नाला सफाईच्या नावाखाली देयके लाटणाºया अधिकाºयांसह साफसफाई न केलेल्या नाल्यांची तपासणी सुरू होणार असल्याचे वृत्त लोकमतमध्ये उमटताच उत्तर झोनमध्ये आक्षेप नोंदविलेल्या नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनपा प्रशासनाला कधी मुहूर्त सापडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपा प्रशासनाच्यावतीने दरवर्षी मान्सूनपूर्व नाला सफाई केली जाते. नाला सफाईची कामे कागदोपत्री दाखवून त्या बदल्यात लाखो रुपयांची देयके उकळण्याचे काम मनपा कर्मचाºयांच्या संगतीने कंत्राटदार करीत होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर नाला सफाई करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी झोननिहाय नाल्यांची संख्या निश्चित करण्यात आली. तसेच जेवढे काम तेवढा निधी वापरण्याची क्षेत्रीय अधिकाºयांना मुभा दिली. आयुक्त लहाने यांनी क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर नाला सफाईचा निर्णय घेतल्यामुळे ही कामे प्रामाणिकपणे होतील, अशी अपेक्षा होती. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार घडल्याचे समोर आले. उत्तर झोनमधील काँग्रेस नगरसेविका चांदणी शिंदे यांचे पती रवी शिंदे यांनी त्यांच्या प्रभाग दोनमध्ये केलेल्या नाला सफाईच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या प्रभागातील नेमक्या किती नाल्यांची साफसफाई करण्यात आली, यासंदर्भात रवी शिंदे यांनी माहिती अधिकारात माहिती घेतली असता प्रभाग दोनमध्ये मोठ्या नऊ नाल्यांची साफसफाई केल्याचे स्पष्टीकरण उत्तर झोनच्यावतीने देण्यात आले. प्रशासनाने नऊपैकी केवळ सहा नाल्यांची साफसफाई केली असून, उर्वरित तीन मोठ्या नाल्यांची साफसफाई न करताच देयक मंजूर केल्याचा आरोप समाजसेवक रवी शिंदे यांनी केला होता. ही परिस्थिती एका झोनमधील नसून, इतरही ठिकाणी काही नाल्यांची साफसफाई झाली नसल्याचा मुद्दा लोकमतने लावून धरला. या प्रकरणाची आयुक्त लहाने यांनी गंभीर दखल घेऊन झोन अधिकाºयांनी सादर केलेल्या देयकांची चौकशी आणि नाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी निर्णय घेताक्षणी कागदोपत्री ज्या नाल्यांची साफसफाई केल्याचे दाखविण्यात आले होते, अशा नाल्यांची २९ जुलैपासून उत्तर झोनमध्ये साफसफाई केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.