मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:35 PM2018-08-28T14:35:57+5:302018-08-28T14:37:40+5:30
कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.
अकोला: यंदाच्या २0१८-१९ च्या शैक्षणिक सत्रामध्ये अनेक महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके गठित करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १८ आॅगस्ट रोजी दिले आहेत.
क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या महाविद्यालयांची तपासणी करून ती यादी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शासनाकडे सादर करावी. एवढेच नाहीतर अतिरिक्त प्रवेश रद्द करण्याचे आदेशात बजावले आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असल्यास, त्या महाविद्यालयातील अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. आदेशानुसार महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी प्रवेश रद्द केले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
शहरी विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात घेतलेले प्रवेश रद्द होणार!
शहरात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्यात आली होती. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांनी शहरातीलच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायला पाहिजे होते; परंतु शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेता, ग्रामीण भागात प्रवेश घेतले. त्यांचे प्रवेश तातडीने रद्द करून त्यांना केंद्रीय पद्धतीने अकरावीत प्रवेश देण्यास बजावले आहेत.
तरच बारावी परीक्षेचे अर्ज मंजूर!
राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची सरलमधील माहिती ३0 सप्टेंबरपर्यंत अपडेट करावी. महाविद्यालयांना मंजूर केलेली प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच बारावी परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर केले जातील, असा इशारासुद्धा दिला आहे.
लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येईल. ज्यांनी मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिले आहेत. त्यांनी ते रद्द करावेत. अन्यथा त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल. २
प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प. अकोला.