अकोला जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:04 PM2017-11-17T14:04:18+5:302017-11-17T14:07:13+5:30
अकोला : जिल्ह्यातील ५९ खदानींच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील ५९ खदानींच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये खनिपट्टाधारकांनी ‘रॉयल्टी’चा केलेला भरणा आणि त्या तुलनेत खदानींमधील मुरूम, दगड इत्यादी गौण खनिजाचे करण्यात आलेले उत्खननाचे मोजमाप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांत ५९ खदानी आहेत. खदानींमधील मुरूम व दगड या गौण खनिजाच्या उत्खननापोटी जमा केलेली ‘रॉयल्टी’ची रक्कम आणि खदानींचे प्रत्यक्ष करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात पडताळणी करण्यासाठी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) मशीनद्वारे खदानींमधील गौण खनिजाचे करण्यात आलेल्या उत्खननाचे मोजमाप करण्यात येत आहे. त्यामध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत अकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांतील खदानींच्या उत्खनाची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, अकोला तालुक्यातील खदानींच्या गौण खनिज उत्खननाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील खदानींच्या गौण खनिज उत्खननाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर भूवैज्ञानिक व खनिकर्म संचालनालयाच्या ‘सर्व्हेअर’मार्फत तपासणीचा अहवाल जिल्हा खनिकर्म अधिकाºयांकडे सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अशा आहेत खदानी!
तालुका खदानी
अकोला २२
अकोट ०५
बार्शीटाकळी ११
पातूर ०४
मूर्तिजापूर १७
बाळापूर ००
तेल्हारा ००
..................................
एकूण ५९
खनिकर्म संचालनालयाकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच तपासणी!
जिल्ह्यातील खदानींच्या उत्खननाची शासनाच्या भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत पहिल्यांदाच तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत खनिपट्टाधारकांनी ‘रॉयल्टी’पोटी जमा केलेली रक्कम आणि प्रत्यक्षात खदानींमधून गौण खनिजाचे करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात मोजमाप करून पडताळणी केली जात आहे.
जिल्ह्यातील खदानींमधील गौण खनिजाच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
- अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी.