जिल्ह्यातील ९ चेक पोस्टवर साडेतीन हजार वाहनांची तपासणी
By सचिन राऊत | Published: March 24, 2024 05:25 PM2024-03-24T17:25:45+5:302024-03-24T17:26:23+5:30
लोकसभा सार्वत्रीक निवडणूक शांततेच्या व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होवू नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने अकोला जिल्हयाच्या सिमेलगत चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून खबरदारी अकोला : लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ च्या प्रक्रीयेची घोषणा केली असून जिल्हयात आचारसंहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्यातून जाणाऱ्या सुमारे साडेतीन हजारावर वाहनांची अकोलापोलिसांनी चेक पोस्टवर तपासणी केली आहे. लोकसभा सार्वत्रीक निवडणूक शांततेच्या व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या अनुषंगाने तसेच निवडणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार होवू नये या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने अकोला जिल्हयाच्या सिमेलगत चेकपोस्टची निर्मिती करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीत अकोला ते खामगांव रोडवर पिवळा नाला, पोलीस स्टेशन पातूर अंतर्गत अकोला ते वाशिम रोडवर वाशिम जिल्हा सरहद्दीवर नवरखेड फाटा, अकोट ग्रामीण येथे अकोट ते अंजनगांव रोडवर जि. अमरावती सरहद्दीवर रुईखेड फाटा येथे तसेच अकोट ते दर्यापूर रोडवर सावरा फाटा जि. अमरावती सरहद्द येथे चेक पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच तेल्हारा अंतर्गत तेल्हारा ते वरवट बकाल रोडवर माळेगांव बाजार येथे जि. बुलढाणा सरहद्द, हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अकोला ते सोनाळा जि बुलढाणाकडे जाणाऱ्या रोडवर वरखेड फाटा येथे, मुर्तिजापूर ग्रामीण हद्दीत मुर्तिजापूर ते कारंजा जि. वाशिमकडे जाणाऱ्या रोडवर खुनेमोह फाटा येथे व पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत अकोला- मंगरूळपीर रोड जि वाशिमकडिल मार्गावर कासमोर फाटा येथे चेक पोस्ट असुन माना अंतर्गत अकोला ते अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर नागझरी फाटा अशा एकुण ०९ ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी शस्त्रधारी पोलीस अंमलदार यांची नियुक्त करण्यात आली आहे. निवडणूक कालावधी दरम्यान इतर जिल्हयातून चोरट्या मार्गाने होणाऱ्या बेकायदेशीर वाहतूकीवर निर्बंध घालून निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावी याकरिता चेक पोस्ट लावण्यात आलेल्या आहेत. ०९ चेक पोस्टचे ठिकाणी २२.मार्चपर्यंत पर्यंत एकुण ३ हजार ३५६ वाहनांची कसुन तपासणी करण्यात आली आहे.