लघू व्यावसायिकांकडून हप्ता वसुली
By admin | Published: November 1, 2016 02:03 AM2016-11-01T02:03:29+5:302016-11-01T02:03:29+5:30
मनपाच्या मानसेवी कर्मचा-यांचा प्रताप.
अकोला, दि. ३१- दिवाळीसाठी विविध साहित्याची विक्री करणार्या लघू व्यावसायिकांकडून हप्ता वसुली करण्याचे काम मागील चार दिवसांपासून केले जात आहे. ही वसुली शहरातील गावगुंडांकडून होत नसून, चक्क मनपाच्या मानसेवी कर्मचार्यांकडून केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
दिवाळी सणाच्या निमित्त शहरातील बाजारपेठ सजली असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्य बाजारपेठेत जिल्हाभरातून दाखल झालेल्या लघू व्यावसायिकांनी झाडू, सुपळी, पणत्या, मापलं, देवतांचे फोटो, झेंडूची फुले आदी किरकोळ वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. संबंधित व्यावसायिकांकडून महापालिकेच्या बाजार वसुली विभागाकडून दररोज १0 रुपयांप्रमाणे शुल्क वसूल केले जाते.
असे असताना मनपात मानधनावर कार्यरत काही कर्मचारीदेखील लघू व्यावसायिकांकडून मागील चार दिवसांपासून पैसे वसूल करीत असल्याची माहिती आहे. पैसे जमा न करणार्या गोरगरीब लघू व्यावसायिकांना कायद्याचा धाक दाखवला जात आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.