मृत बालकाऐवजी जिवंत बालिका दिली आप्तेष्टांच्या ताब्यात!
By admin | Published: January 15, 2016 02:03 AM2016-01-15T02:03:24+5:302016-01-15T02:03:24+5:30
मृत बालक समजून होणार होते जिवंत बालिकेवर अंत्यसंस्कार, अकोला सर्वोपचार रुग्णालयातील घटना
अकोला: सर्वोपचार रुग्णालयामध्ये एका मृत बालकाचा मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याऐवजी दुसर्या एका महिलेची जिवंत मुलगी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी उघडकीस आला. विशेष म्हणजे, मृत बालकाचे आप्तेष्ट जिवंत मुलीचाच आपला मुलगा समजून अंत्यसंस्कार करायला घेऊन गेले होते. सुदैवाने मुलीची हालचाल दिसून आल्याने अनर्थ टळला. सर्वोपचार रुग्णालय वेगवेळय़ा घडामोडींनी नेहमीच चर्चेत राहते. शुक्रवारी बालकांची अदलाबदली करून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी कळसच गाठला. ९ जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील शेलगाव येथील २१ वर्षीय महिला प्रियंका प्रशांत वाघ ही प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली. महिलेने १0 जानेवारी रोजी सकाळी ११.३0 वाजता एका मुलाला जन्म दिला; परंतु मुलाची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला प्री-मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले. तीन, चार दिवस उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी मुलाचा मृत्यू झाला; परंतु, याची माहिती प्रियंकाला तिच्या पतीने दिली नाही. प्री-मॅच्युअर बेबी युनिटमधील मृत मुलाला रुग्णालयातील कार्यरत कर्मचार्यांनी कापडामध्ये गुंडाळून प्रियंकाच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. कापडामध्ये पूर्णत: गुंडाळलेल्या मुलाला घेऊन नातेवाईक शेलगाव येथे अंत्यसंस्कारासाठी जाण्याकरीता रुग्णवाहिकेने निघाले. दरम्यान, काही नातेवाइकांनी मुलाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मुलाच्या तोंडावरील कापड बाजूला केल्यावर त्यांना डोळय़ांच्या पापण्याची हालचाल होत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्या ताब्यात मृत मुलाऐवजी जिवंत मुलगी ताब्यात दिल्याची बाब समोर आल्याने नातेवाईकांनीही आश्चर्य व्यक्त केले. तेथील कर्मचार्यांनी मुलीला ताब्यात घेऊना प्री मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले.