विद्यार्थ्यांना मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 01:05 PM2019-07-13T13:05:19+5:302019-07-13T13:05:40+5:30
विहित मुदतीत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत.
अकोला : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांना विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे यांनी शुक्रवारी येथे दिली.
विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत मिळतात की नाही, विद्यार्थ्यांना विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात अडचणी आहेत काय, यासंदर्भात अकोला व वाशिम जिल्ह्यातील कामाचा आढावा अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विहित मुदतीत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांना देण्यात आले आहेत, असे कैलास कणसे यांनी सांगितले. यावेळी अकोला व वाशिम जिल्ह्यातील जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समित्यांचे अधिकारी उपस्थित होते.
‘यूपीएससी कोचिंग’साठी
२०० विद्यार्थ्यांना पाठविले दिल्लीला!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) ‘आयबीपीएस’ योजनेंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी परीक्षेच्या कोचिंगसाठी पाठविले जाते. त्यामध्ये यावर्षी राज्यातील २०० विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’च्या ‘कोचिंग’साठी दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.
योजनांच्या जनजागृतीचा कार्यक्रम राबविणार!
शासनामार्फत मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनांसंदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम ‘बार्टी’मार्फत राज्यात राबविण्यात येणार आहे, असेही कैलास कणसे यांनी सांगितले.