इन्सुलेटर निकामी; मोठा भाग अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:41 PM2017-09-08T20:41:47+5:302017-09-08T20:41:53+5:30
विद्युत वाहिन्यांची जीर्ण व जुनी झालेली यंत्रणा महावितरणसह नागरिकांनाही त्रासदायक ठरत असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुरुवारी मध्यरात्री सुधीर कॉलनी फिडरवरील नागरिकांना याचा प्रत्यय आला. पावसामुळे इन्सुलेटर निकामी झाल्याने सुधीर कॉलनी फिडरवर असलेल्या मोठय़ा भागातील वीजपुरवठा मध्यरात्री १.४५ वाजता खंडित झाला होता. त्यामुळे जठारपेठ, खेळकर नगर, राऊतवाडी, उमरी, जवाहरनगर, सुधीर कॉलनी, रणपिसे नगर यासह मोठय़ा भागातील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विद्युत वाहिन्यांची जीर्ण व जुनी झालेली यंत्रणा महावितरणसह नागरिकांनाही त्रासदायक ठरत असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुरुवारी मध्यरात्री सुधीर कॉलनी फिडरवरील नागरिकांना याचा प्रत्यय आला. पावसामुळे इन्सुलेटर निकामी झाल्याने सुधीर कॉलनी फिडरवर असलेल्या मोठय़ा भागातील वीजपुरवठा मध्यरात्री १.४५ वाजता खंडित झाला होता. त्यामुळे जठारपेठ, खेळकर नगर, राऊतवाडी, उमरी, जवाहरनगर, सुधीर कॉलनी, रणपिसे नगर यासह मोठय़ा भागातील नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली.
सुधीर कॉलनी फिडरवर जवळपास ५५ ट्रान्सफार्मर असून, या फिडरला उमरी विद्युत उपकेंद्रावरून वीज पुरवठा होतो. गुरुवारी रात्री या भागात अचानक आलेल्या पावसामुळे विद्युत वाहिनीवरील इन्सुलेटर निकामी होऊन वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या संबंधित कर्मचार्यांनी रात्री २. ३0 वाजेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले; परंतु नेमका बिघाड निदर्शनास न आल्यामुळे या फिडरवरील ५ ते ६ ट्रान्सफॉर्मचा वीजपुरवठा रात्रभर खंडित राहिला. यामध्ये खेडकर नगर, जठारपेठ, राऊतवाडी, उमरी, जवाहर नगर, सुधीर कॉलनी या भागांचा समावेश आहे. वीजपुरवठा नसल्याने प्रचंड उकाडा व डासांचा त्रास यामुळे या भागातील नागरिकांना रात्रभर अक्षरश: जागून काढावी लागली. अखेर शुक्रवारी सकाळी १0 वाजेपर्यंत या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
घामाच्या धारा अन् डासांचा उच्छाद
मध्यरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील नागरिकांची झोप उडाली. आधीच उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वीज पुरवठा खंडित झाल्याने आणखी भरच पडली. त्यात शहरात सध्या डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. वीज गेल्याने रात्रभर या भागातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागला. रात्रभर जीव अगदी मेटाकुटीस आला होता, अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.