आंतरजिल्हा गुन्हे करणारी टोळी जेरबंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 06:49 PM2021-02-04T18:49:47+5:302021-02-04T18:50:04+5:30
Crime News त्यांच्याकडून २१ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला : आंतरजिल्हा गुन्हे करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत गुरुवारी जेरबंद केले. कारवाईत पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २१ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान पोलिसांनी सात गोडाऊन फोडीचे गुन्हे उघडकीस आणले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रिधोरा येथील वेअर हाऊसचे शटर तोडून २ लाख ४०,५०० रुपये किमतीचे ६५ किलो वजनाचे ७४ तुरीचे कट्टे गेल्याची तक्रार २९ मार्च २०२० रोजी बजरंग तुकाराम शर्मा यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात केली होती. याच दरम्यान बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील गोडाऊन फोडीचे गुन्हे समोर आले होते. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सापळा रचून एका टोळीला जेरबंद केले. कारवाईत पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील असादुधा येथील विश्वनाथ किसन चौके, शेगाव तालुक्यातील तित्रव येथील ज्ञानदेव त्रंबक बघे, शेगाव येथील विठ्ठल पंजाबराव महेंगे, गजानन हरिभाऊ कोटोरे, निवृत्ती राम घटे, श्रीकृष्ण गजानन करंगळे, श्रीधर तुळशीराम पठाण, आकाश विकास बिल्लेवार, किसना दयाराम भगेवार, नीलेश प्रकाश बघे, छगन पुंजाजी बघे, श्याम भीमराव सैरीसे आदींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ८० कट्टे तूर, १० लाख रुपये किमतीची दोन वाहने, ३० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयांचा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत मुद्देमाल, तसेच बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील तूर, सोयाबीन, हरभरा एकूण ८ लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल, असा एकूण २१ लाख २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार नेवारे, पोलीस हवालदार ढोरे, शक्ती कांबळे, वसीम शेख, संदीप ताले, संदीप काटकर, मनोज नागमते, गीता अवचार यांनी केली.
पथकाला १५ हजारांचे बक्षीस
या कारवाईची दखल राज्याचे पोलीस महासंचालक यांनी घेतली. तसेच २०२० मधील सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगतबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १५ हजारांचे बक्षीस मंजूर केले.