आंतरजिल्हा बदल्यांमध्ये घोळ; शिक्षकांवर कारवाई, अधिकारी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:32 PM2018-04-02T14:32:26+5:302018-04-02T14:32:26+5:30
अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला.
अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार असताना वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. सुभाष पवार, शिक्षणाधिकाºयांवर अनियमिततेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी जुलै २०१३ मध्येच दिला, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदल्यांमध्ये कमालीचे घोळ झाले. त्याचवेळी त्यांच्या रजेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्याकडे देण्यात आला. प्रभाराच्या शेवटच्या दिवशी डॉ. पवार यांनी तब्बल १३ शिक्षकांना अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने सामावून घेतले. हा प्रकार त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या तक्रारीतून पुढे आला, तर माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेत बदली आदेश रद्द करून अधिकाºयांवर कारवाईसाठी याचिका दाखल केली. आयुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी कमालीची अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी नोंदवलेल्या निरीक्षणात डॉ. पवार यांच्या आदेशातील अनेक अनियमिततेवर बोट ठेवले.
बदली प्रक्रियेतील घोळाचे मुद्दे
- जिल्हा परिषदेत १८५ शिक्षक अतिरिक्त असताना १३ शिक्षकांना नियमबाह्यपणे सामावून घेणे. शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास त्यासाठी शिक्षणाधिकाºयांना जबाबदार धरण्याचे नमूद करणे.
- रिक्त जागा नव्हत्या, तरी मोघम संमती देणे.
जिल्हा परिषद कार्यालय स्तरावर सहायक शिक्षकाचे एकही पद मंजूर नाही. तरीही १३ शिक्षकांना जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात हजेरीपट ठेवून रुजू करून घेतले. ही बाब पूर्णत: चुकीची, बेकायदेशीर, मनमानीपणाची आहे.
कोणत्याही प्रवर्गात रिक्त जागा नसताना शासन नियमांना डावलून शिक्षकांना सामावून घेण्यात आले, ते बेकायदेशीर आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांचा आदेश बेजबाबदारपणाचा, बेकायदेशीर असल्याने ते कारवाईस पात्र आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेशही विभागीय आयुक्तांनी जुलै २०१३ मध्येच दिला. त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही.
- अधिकाºयांवर कारवाईसाठी टाळाटाळ
दरम्यान, बिंदूनामावली अंतिम करताना आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांवर कारवाई झाली. त्याचवेळी मुद्दामपणे शासन निर्णयाचे उल्लंघन करणारे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांवर कारवाईसाठी चार वर्षांपासून टाळाटाळ सुरू असल्याचे यानिमित्ताने पुढे येत आहे.
या शिक्षकांना दिली नियमाबाह्य पदस्थापना
रघुनाथ पांडे, चंदा पवार, रुपेश राठोड, प्रदीप जाधव, राजेंद्र दिवनाले, प्रतिभा बचे, सीमा सरोदे, प्रशांत सरोदे, नजमुस्साहेर अफगाणी, रेणुका बाबर, ज्योती गाडगे, सुरेखा बिजवे, धर्मेंद्र चव्हाण.