आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा: महाराष्ट्रातील विद्यापीठ संघांची विजयी घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:31 PM2019-11-22T12:31:59+5:302019-11-22T12:32:09+5:30
मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठ संघांनी आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत धडक दिली.
- नीलिमा शिंगणे-जगड
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गुरुवारी उपांत्य फेरीतील सामने उत्कंठावर्धक झाले. स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्रातील विद्यापीठांनी गाजविला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठ संघांनी आपले वर्चस्व कायम राखत अंतिम फेरीत धडक दिली.
झोन अ मधला सामना मुंबई विद्यापीठ व वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठ संघात झाला. मुंबई विद्यापीठाने हा सामना ११-०१ (१ डाव १० गुण) अशा मोठ्या गुणफरकाने जिंकला. मुंबई संघाच्या रू पाली बडे हिने ५ मिनिटे ४० सेकंद संरक्षण केले; मात्र गडी बाद करण्यात तिला यश मिळाले नाही. कविता धाबेकर ३.२० सेकंद संरक्षण करीत १ गडी बाद केला. आरती कदमने चपळतापूर्ण खेळी करीत तब्बल ५ खेळाडूंना मैदानाबाहेर केले. गुजरात विद्यापीठाच्या सुनीता बछे हिने १.२० सेकंद तर अर्पिता गामजी हिने २.३० सेकंद संरक्षण केले. झोन ब मधील सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व युनिव्हर्सिटी आॅफ राजस्थान संघात चुरशीचा झाला. पुणे विद्यापीठाने सामना १ डाव ७ गुणांनी जिंकला.
पुण्याची प्रियंका इंगळे हिने अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने जिंकली. २ मिनिटांच्या संरक्षण खेळीत सर्वाधिक ७ गडी बाद केले. आजचा दिवस प्रियंकाने गाजविला. स्नेहल जाधव हिने २.१० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले. राजस्थान संघाकडून मानसी तिवारी हिने १.५० सेकंद संरक्षण केले. या सामन्यावर १६-०९ गुणांनी पुणे संघाने विजय मिळविला.
आतापर्यंत स्पर्धेत झालेल्या सामन्यांपैकी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आरटीएम नागपूर विद्यापीठ संघातील सामना रोमहर्षक झाला.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा सामना अखेर कोल्हापूर संघाने जिंकला. १ डाव १ गुणांनी कोल्हापूर संघाने झोन सी मध्ये विजय मिळवून अंतिम फेरीकरिता पात्रता सिद्ध केली. कोल्हापूरच्या धनश्री भोसले हिने ४.३० सेकंद खेळ करीत २ गडी बाद केले. करिश्मा रिकीबदार २.४० सेकंद संरक्षण करताना ४ गडी बाद केले. नागपूर संघाकडून स्वाती सातार हिने १ मिनीट २० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले. दिव्या आकरे हिने १.३० सेकंद पळतीचा खेळ केला. अटीतटीच्या या सामन्यात कोल्हापूर संघाने ९-८ अशा गुणांनी विजय मिळविला.
अमरावती विद्यापीठाची जळगाव संघावर मात
झोन ड मधील सामना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघात झाला. रोमांचक झालेल्या या सामन्यात अमरावती विद्यापीठाने १०-५ गुणांनी विजय मिळविला. अमरावतीच्या पायल जाधव हिने ४.५० सेकंद संरक्षण करीत ४ गडी बाद केले. श्रद्धा बोदिले हिने ३.३० सेकंद पळतीचा खेळ केला. तिला गडी बाद करण्यात यश मिळाले नाही. स्वाती लांजेवार हिने सुंदर खेळप्रदर्शन केले. २.२० सेकंद संरक्षण करीत २ गडी बाद केले. जळगाव विद्यापीठाकडून अंजली चौहान आणि सायली चिट्टे यांनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत प्रत्येकी १ गडी बाद केला.