पीक कर्जावरील व्याजमाफी एकरी १६0 रुपये!

By Admin | Published: January 5, 2017 02:42 AM2017-01-05T02:42:59+5:302017-01-05T02:42:59+5:30

शेतकर्‍यांची बोळवण; पंतप्रधानांच्या घोषणेत तोकडी व्याजमाफी.

The interest on crop loans is Rs 160! | पीक कर्जावरील व्याजमाफी एकरी १६0 रुपये!

पीक कर्जावरील व्याजमाफी एकरी १६0 रुपये!

googlenewsNext

अकोला, दि. ४- नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील गत दोन महिन्यांच्या व्याजमाफीची घोषणा पंतप्रधानांनी केली. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, या पिकांसाठी मिळालेले कर्ज आणि त्यावर दोन महिन्यांची मिळणारी व्याजमाफी बघता, शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील एकरी केवळ १६0 रुपये व्याजमाफीचा लाभ होणार आहे. व्याजमाफीची ही रक्कम अत्यंत तोकडी असल्याने, व्याजमाफीची ही घोषणा शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.
गत ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारमार्फत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. नोटाबंदीच्या आदेशामुळे बँकांच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले होते. गत ३१ डिसेंबरपर्यंत आर्थिक निर्बंध लागू होते. या ५0 दिवसांच्या नोटाबंदीच्या कालावधीत शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे व्याज माफ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ३१ डिसेंबर रोजी केली. यावर्षीच्या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १ लाख २१ हजार ३५६ शेतकर्‍यांना ८१८ कोटी ४९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. कापूस आणि सोयाबीन ही जिल्ह्यातील मुख्य पिके असून, कापूस पिकासाठी हेक्टरी ३४ हजार आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी २६ हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज बँकांमार्फत मंजूर करण्या त आले. खरीप पीक कर्जावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत सहा टक्के, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत सात टक्के व्याजदर आकारला जातो. त्यानुसार प्रचलित व्याजदरानुसार एकरी १६ हजार रुपयांच्या कपाशीच्या पीक कर्जावर सहा टक्के व्याजदराप्रमाणे दोन महिन्यांचे व्याज १६0 रुपये होते, तर सोयाबीन पिकाच्या पीक कर्जावरील एकरी व्याज १३0 रु पये होते. त्यानुसार जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील दोन महिन्यांचे व्याज केवळ १३0 ते १६0 रुपये माफ होणार आहे. या पृष्ठभूमीवर पीक कर्जावरील नोटाबंदीच्या कालावधीतील दोन महिन्यांच्या व्याजमाफीच्या या घोषणेत शासनामार्फत अत्यंत तोकडी रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पीक कर्जावरील व्याजमाफीची ही घोषणा संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची बोळवण करणारी ठरणार आहे.

रब्बी पीक कर्ज वाटप केवळ १५ कोटी!
यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ५१ कोटी ५२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे; मात्र त्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ १ हजार ६१५ शेतकर्‍यांना १५ कोटी ६४ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: The interest on crop loans is Rs 160!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.