पैसेवारी ४७ पैसे; जिल्ह्यात दुष्काळाचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:16 AM2021-01-02T04:16:15+5:302021-01-02T04:16:15+5:30
अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप ...
अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे वास्तव समोर आले आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात गत जून ते सप्टेंबर आणि त्यानंतर ऑक्टोबरअखेरपर्यंत जोरदार पाऊस बरसला. सतत पाऊस आणि पुरामुळे जिल्ह्यात मूग व उडीद पिकाचे उत्पादन बुडाले. तसेच सोयाबीन, कपाशी, ज्वारी व तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या उत्पादनातही घट झाल्याने, शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर पीक कापणी प्रयोगाच्या आधारे जिल्ह्यातील तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण १ हजार १२ महसुली गावांपैकी लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असल्याचे वास्तव समोर आले आहे.
५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी
असलेली तालुकानिहाय गावे !
तालुका गावे पैसेवारी
अकोला १८१ ४६
अकोट १८५ ४८
तेल्हारा १०६ ४५
बाळापूर १०३ ४७
पातूर ९४ ४८
मूर्तिजापूर १६४ ४७
बार्शिटाकळी १५७ ४८
..............................................................
एकूण ९९० ४७
शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा !
गत पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. ऑक्टोबर अखेरपर्यंत पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात २६ कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली; मात्र दुसऱ्या टप्प्यातील मदतीची रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच ऑक्टोबरमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची प्रतीक्षा केली जात आहे.
दुष्काळी सोयी,
सवलती लागू होणार?
जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले. त्या आनुषंगाने शासनाकडून जिल्ह्यात दुष्काळी सोयी, सवलती लागू होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील तहसीलदारांकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व लागवडीयोग्य गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी