आंतरजिल्हा बदलीत आलेल्या शिक्षकाला परस्पर दिली नियुक्ती!
By admin | Published: September 14, 2016 02:15 AM2016-09-14T02:15:12+5:302016-09-14T02:15:12+5:30
बीडीओ वेले यांचा प्रताप; सीईओंनी दिली ‘शो कॉज’.
अकोला, दि. १३ : जिल्हाभरात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा गोंधळ सुरू असतानाच बाळापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी वेले यांनी आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकाला परस्पर नियुक्ती देण्याचा प्रकार केला आहे. ही बाब सोमवारी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आल्यावर जिल्हाधिकार्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला असून, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण विधळे यांनी वेले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाभरात सध्या माध्यमिक विभागाचे ११९ तर, प्राथमिक विभागात १३ खासगी शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सध्या वेगात आहे. अशा स्थितीमध्ये बाळापूरचे तत्कालीन व आताचे अकोला गटविकास अधिकारी वेले यांनी नांदेड जिल्हय़ातून बदलून आलेल्या एका शिक्षकाला बाळापूर पंचायत समितीमध्ये परस्पर रुजू करून घेतले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेला कुठलीही माहिती वेले यांनी दिली नाही. मुख्यमंत्री १६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेणार आहेत. त्यानिमित्ताने सोमवारी जिल्हाधिकारी जी. ङ्म्रीकांत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा सर्व प्रकार समोर आला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी चांगलेच संतप्त झाले. संबंधित बीडीओंची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले.
*जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती न देता आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकाला परस्पर नियुक्ती देण्याचा प्रकार गंभीर असून, यासंदर्भात बीडीओंना शो कॉज बजावण्यात आली आहे.
-अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.