आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्पर्धा : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला अजिंक्यपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:39 PM2019-01-22T13:39:58+5:302019-01-22T13:40:12+5:30
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ (कृषी) कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधीक गुण मिळवित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाने पटकाविले.
- नीलिमा श्ािंगणे-जगड
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ (कृषी) कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे अजिंक्यपद सर्वाधीक गुण मिळवित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाने पटकाविले. तीन दिवसीय या स्पर्धेचा समारोप सोमवारी झाला. महाबीज अकोला व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत राहुरी, परभणी, महाबीज, दापोली विद्यापीठासह महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि यजमान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संघ सहभागी झाले होते. तीनशेच्या वर महिला व पुरुष खेळाडूंनी स्पर्धेत खेळप्रदर्शन केले. बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या गटात पाच आणि महिला गटात चार संघ सहभागी झाले. पुरुषांमध्ये परभणी व पीकेव्ही संघात अंतिम सामना होऊन यामध्ये परभणी संघाने विजय मिळविला. महिलांमध्ये राहुरी संघाने पीकेव्ही संघाचा पराभव केला. बुद्धिबळ स्पर्धेत पुरुष गटात पाच संघ सहभागी होऊन अंतिम सामना परभणी व राहुरी संघात झाला. राहुरीने सामना जिंकला. महिलांच्या गटात पीकेव्ही व राहुरी संघात सामना होऊन पीकेव्ही अकोला संघाने विजय मिळविला. महिला गटात तीन संघ सहभागी झाले होते. व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषांचे सहा संघ सहभागी होऊन, नऊ फेऱ्या खेळले. अंतिम सामना पीकेव्ही व परभणी संघात झाला. पीकेव्ही संघाने सामना जिंकला. बास्केटबॉल स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. यामध्ये सात फेरी खेळल्या गेल्या. अंतिम सामना राहुरी व पीकेव्ही संघात अतितटीचा झाला. घरच्या मैदानावर यजमान पीकेव्ही संघाचा पराभव करू न राहुरी संघाने स्पर्धेवर वर्चस्व प्रस्थापित केले. क्रिकेट साखळी सामन्यांमध्ये नऊ फेरी होऊन परभणी, दापोली, राहुरी व पीकेव्ही संघाने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. परभणी व राहुरी संघात अंतिम सामना झाला; मात्र दोन्ही बलाढ्य संघाने सामन्याच्या शेवटपर्यंत सुंदर खेळप्रदर्शन केले. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघाला समान गुण देण्यात आले.
सामना समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. विलास भाले, अधिष्ठाता डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.जी. देशमुख यांनी केले. यावेळी डॉ. भाले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.