Coronavirus अकोला बस स्थानकात वैद्यकीय पथक गैरहजर; प्रवाशाकडून डॉक्टरला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:51 PM2020-03-21T16:51:31+5:302020-03-21T18:21:55+5:30
एका प्रवाशाने डॉक्टरांशी वाद घालत मारहान केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयात कोरोना समुपदेशन कक्षात तपासणीसाठी आलेल्या एका प्रवाशाने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली.
कोरोनाचा संभाव्य धोका पाहता मुंबई, पुणे आणि नागपूर येथून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानक व खासगी लक्झरी बस स्थानक येथे वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी डॉक्टरच उपस्थित नसल्याने प्रवाशांनी थेट सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्ष गाठले.
प्रवाशी नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू असताना एका प्रवाशाने डॉक्टरांशी वाद घालत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. हा प्रकार समजताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्टाता डॉ. शिवहरी घोरपडे, डॉ. श्यामकुमार घोरपडे, डॉ. दिनेश नैताम यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तसेच संबंधित प्रवाशी नागरिकाविरूद्ध डॉक्टरांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.