आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत सादर करणार कलेचा नजराणा
By admin | Published: March 6, 2017 02:05 AM2017-03-06T02:05:34+5:302017-03-06T02:05:34+5:30
रसिकाश्रय, अ.भा. मराठी नाट्य परिषदेचा संयुक्त उपक्रम.
अकोला, दि. ५- रसिकाश्रय व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात बहारदार संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध रंगकर्मी राम जाधव यांच्या ८४ व्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत संगीताचा नजराणा सादर करणार असल्याची माहिती, रविवारी राम जाधव यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रपरिषदेत संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली.
मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे व नाट्य समेलनाध्यक्षपद भुषविणारे, तसेच आपल्या अद्वितीय कर्तृत्वाचा ठसा राज्यातच नव्हे, तर दिल्लीपर्यंंंंत उमटविणारे रंगयोगी राम जाधव हे येत्या २२ मार्च रोजी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त रसिकाश्रय व अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्यावतीने अकोलेकर रसिकांसाठी नि:शुल्क संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
२२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, अमरावतीचे आयजी विठ्ठलराव जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, प्रा. सतीश फडके हे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत प्रा. अनिरुद्ध खरे हे अभंग, कथ्थक नृत्य मंदिराच्या ईशानी साठे कथ्थक नृत्य सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुफी गायक डॉ. कृष्णकांत शुक्ला व त्यांचे सहकारी कबीर-गोरख भजन संध्या सादर करणार आहेत, तर हरियाणा कलारत्न प्रा. महावीर गुड्ड हे आपल्या १५ सहकार्यांसह लोककला सादर करणार आहेत. नि:शुल्क असलेल्या या संगीतमय नजराण्याचा लाभ अकोलेकरांनी घ्यावा, असे आवाहन रसिकाश्रय व अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकार्यांनी यावळी केले. पत्रपरिषदेला ह्यरसिकाश्रयह्णचे अध्यक्ष राम जाधव, उपाध्यक्ष रमाकांत खेतान, प्रमुख कार्यवाह अभिजित परांजपे, सहकार्यवाह शुभदा देव, सचिव अनिल कुळकर्णी, बंडोपंत कोदंडे, शशी जोशी, राजकुमार चवरे, रमेश जांभोरकर, प्रा. डॉ. वर्षा बाकरे पाटील, मालती भेंडे, कमल गिरी यांच्यासह संस्थेचे मानद सदस्य व सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.