आंतरराष्ट्रीय नदी दिन विशेष: जीवनदायिनी नद्या बनताहेत मृत्युदायिनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 10:52 AM2020-09-27T10:52:33+5:302020-09-27T10:52:43+5:30
आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे.
अकोला : एकेकाळी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. भारतीय संस्कृतीमध्ये नदीला महत्त्वाचे स्थान आहे. नदी काठावरच गावे, वस्ती वसायची; परंतु आता याच जीवनदायिनी असलेल्या नद्या मृत्युदायिनी बनत आहेत. अवैध रेती उत्खनन आणि कारखाने, उद्योगांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांचे जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होत असून, काही छोट्या नद्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पूर्वी नद्यांना जीवनदायिनी म्हटले जायचे. आता नद्या मृत्युदायिनी बनत असल्याचे चित्र देशभरातच नव्हे तर जगभरात दिसून येत आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना महापूर आले. महापुरांमुळे शेतीसोबतच अनेक गावे, शहरांनासुद्धा झळ पोहोचली. नद्यांमध्ये अवैधरित्या होत असलेल्या रेतीच्या उत्खनामुळे नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. रेती उत्खननामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्या आहेत. पुढील पिढीला स्वच्छ पाणी द्यायचे असेल तर आज आपल्या नद्या वाचविणे गरजेचे झाले आहे; पण शहर असो वा गाव, सगळीकडेच नदी प्रदूषित झाली आहे. प्रत्येक नदीच्या काठावर एक संस्कृती आहे. प्रत्येक नदीसोबत एक पारंपरिक कथा आहे; परंतु आता काळानुरूप तिचे महत्त्व कमी झाले आहे. त्याला कारण बोअरिंग व धरणांमुळे सहज उपलब्ध होणारे पाणी. त्यामुळे नदीचे महत्त्व कमी झाले आहे व गंगेचे स्वरूप जाऊन गटारगंगेचे स्वरूप तिला प्राप्त झाले आहे. पूर्वी नदीच्या आधारेच बारमाही शेती होत असे. आज भारतातील जास्त जास्त शेती भूजलावर होते.
भूजल पातळीवर परिणाम
एका सर्व्हेनुसार २००७ ते २०१७ या १० वर्षात भारताची भूजल पातळी ६१ टक्क्यांनी घटली आहे. नद्या विविध कारणांनी प्रदूषित होत आहे. ज्यामधील प्रमुख कारण म्हणजे कारखान्यामधून विनाप्रक्रिया सोडलेले पाणी. भारतात सुमारे ८० टक्के रोग अशुद्ध पाण्यामुळे होतात. भारतातील ५ वर्षाखालील सुमारे २ कोटी मुलांचा मृत्यू थेट अशुद्ध पाण्याशी संबंधित आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या
पूर्णा ही प्रमुख नदी आहे. पूर्णा नदीचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गौतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलडाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता मृतावस्थेकडे झुकत आहेत.
प्लास्टिक पिशव्या, रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. नद्या वाचवायच्या असतील तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्या भागातील नद्यांचे प्रदूषण कसे कमी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नदीच्या काठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून नदीकाठांची होणारी धूप थांबविली पाहिजे. नदीतील अवैध उत्खनन, प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येत आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी नदी वाचविण्याची गरज आहे.
- अमोल सावंत, पर्यावरण तज्ज्ञ, निसर्ग कट्टा