भरदिवसा घरफोड्या करणारी आंतरराज्य चोरट्यांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:03+5:302021-02-16T04:20:03+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत ९ मोबाईलसह लॅपटॉप जप्त लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील सिव्हील ...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
९ मोबाईलसह लॅपटॉप जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील सिव्हील लाईन्स, खदान व रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफोडी करून मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम पळविणाऱ्या तामिळनाडूतील अटल चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी बेड्या ठोकल्या. या दोन चोरट्यांकडून नऊ मोबाईल, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, दीड लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुधीर कॉलनीमधील वैष्णवी अपार्टमेंट येथील तीन फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. या तीन फ्लॅटमधून तब्बल पाच मोबाईल व रोख रक्कम पळविण्यात आली होती. याप्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर राम नगर येथील मधू-प्रभा रेसिडेन्सी येथेही चोरी झाली होती. या दोन चोऱ्यांनतर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरी करून दोन मोबाईल व लॅपटॉप पळविण्यात आला होता. या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचा तपास होत नाही तोच रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताहीर अपार्टमेंट येथे भरदिवसा घरफोडी करून मोबाईल व रोख रक्कम पळविण्यात आली होती. या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोऱ्या एकाच टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या चोरट्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, तामिळनाडूतील ही चोरट्यांची टोळी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून यामधील सिरानजीवी नारायणन (२८, वेलुरे, तामिळनाडू) व कुप्पन कांगान रा. वेलुरे, तामिळनाडू) या दोन चोरट्यांना अटक केली. या दोघांकडून ९ मोबाईल, एक लॅपटॉप, रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, नरेंद्र पद्मने, दशरथ बोरकर, नितीन ठाकरे, सदाशिव सुडकर, मोहम्मद रफिक, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवी इरचे, शंकर डाबेराव, मोहम्मद नफिस, स्वप्नील खेडकर, अनिल राठोड, विजय कपले, रवी पालीवाल, सुशील खंडारे, रोशन पटले व सायबर सेलचे गणेश सोनोने यांनी केली.